ब्राझीलने आपल्या विश्वचषकाच्या संघात नेमार ज्युनियरची निवड केली आहे, जी काही दिवसांपूर्वी अनेक स्थानिक विश्लेषक आणि माजी फुटबॉलपटूंना अशक्य वाटत होती. जवळपास तीन वर्षांनी या अनुभवी फॉरवर्डचे राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे. सोमवारी (१८ मे) रिओ दि जानेरो येथे एका भव्य कार्यक्रमात ब्राझीलच्या २६ सदस्यीय संघाची घोषणा करताना प्रशिक्षक कार्लो ऍंसेलोटी यांनी नेमारच्या निवडीला दुजोरा दिला. त्यांनी नेमारचे नाव घेताच तेथे उपस्थित असलेल्यांनी एकच जल्लोष केला.
नेमार हा ब्राझीलसाठी आतापर्यंतचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. त्याने १२८ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ७९ गोल केले आहेत. २०२३ मध्ये त्याला उरुग्वेविरुद्धच्या विश्वचषक पात्रता सामन्यावेळी गुडघ्याला गंभीर (ACL) दुखापत झाली होती आणि तेव्हापासूनच तो राष्ट्रीय संघाबाहेर होता. जून महिन्यात सुरू होणाऱ्या पुरुष फिफा २०२६ विश्वचषकासाठी तो संघात परतणार की नाही याच्या चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू होत्या.
एफसी बार्सिलोना आणि पॅरिस सेंट-जर्मेन एफसीचा माजी स्टार खेळाडू दुखापत आणि अस्थिर फॉर्ममुळे राष्ट्रीय संघाबाहेर होता. त्याच्या फिटनेसबद्दलच्या काळजीने खुद्द ऍंसेलोटी यांनीच त्याला मार्च महिन्यात खेळल्या गेलेल्या फ्रान्स आणि क्रोएशियाविरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यांमधून वगळले होते. या वर्षाच्या सुरूवातीला त्याने त्याच्या लहानपणीच्या क्लब सॅंटोसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, त्याच्या याच निर्णयामुळे त्याला ब्राझीलच्या प्रशिक्षकांचा विश्वास संपादन करण्यासाठी उपयोगी पडला असे दिसते.
“आम्ही वर्षभर नेमारवर लक्ष ठेवून होतो आणि आमच्या असे लक्षात आले की अलीकडच्या काळात तो सातत्याने खेळत आहे आणि तो फिटही आहे,” असे ऍंसेलोटी यांनी म्हटले आहे.
नेमारचा यंदाचा विश्वचषक त्याच्या कारकिर्दीतील चौथा विश्वचषक असणार आहे. त्याने २०१४, २०१८ आणि २०२२ या स्पर्धांमध्ये ब्राझीलचे प्रतिनिधित्व केले होते. त्याच्या संघात परतण्याने संघ आणखी मजूबत झाला आहे, कारण राफिन्हा आणि व्हिनिसियस ज्युनियर यांचा आधीच ब्राझील संघात समावेश आहे.
ब्राझील विक्रमी विश्वचषक जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी त्यांचा समावेश क गटात असून १३ जूनला त्यांचा सामना मोरोक्कोशी आहे.
ब्राझीलचा विश्वचषक संघ :
गोलकीपर – ॲलिसन (लिव्हरपूल), एडरसन (फेनरबाहसे ), वेव्हर्टन (ग्रेमिओ)
डिफेंडर्स – ॲलेक्स सँड्रो , डॅनिलो , लिओ परेरा ( फ्लेमेन्गो ), ब्रेमर ( जुव्हेंटस ), इबानेझ ( अल-अहली ), वेस्ले ( रोमा ), मार्क्विनहोस ( पॅरिस सेंट-जर्मेन ), गॅब्रिएल मॅगाल्हेस ( आर्सनल ), डग्लस सँटोस ( झेनिट सेंट पीटर्सबर्ग )
मिडफिल्डर – ब्रुनो गुइमारेस ( न्यूकॅसल ), कासेमिरो ( मँचेस्टर युनायटेड ), डॅनिलो एस ( बोटाफोगो ), फॅबिन्हो ( अल-इतिहाद ), लुकास पॅकेटा (फ्लेमेंगो)
फॉरवर्ड्स – एन्ड्रिक (लायन), गॅब्रिएल मार्टिनेली (आर्सनल), इगोर थियागो ( ब्रेंटफोर्ड ), मॅथ्यूस कुन्हा (मँचेस्टर युनायटेड), राफिन्हा ( बार्सिलोना ), व्हिनिसियस ज्युनियर ( रिअल माद्रिद ), लुईझ हेन्रिक (झेनिट सेंट पीटर्सबर्ग), नेमार ज्युनियर (सँटोस).






