स्पेनच्या 22 वर्षीय कार्लोस अल्कराजने (Carlos Alcaraz) ऑस्ट्रेलियन ओपन 2026 च्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात टेनिस सम्राट नोव्हाक जोकोविचचा (Novhak jokovich) पराभव करून इतिहास रचला आहे. अल्काराजने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले असून, या विजयामुळे त्याला मिळालेली रक्कम आयपीएल विजेत्या संघाला मिळणाऱ्या रकमेपेक्षाही जास्त आहे.
ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावल्यानंतर अल्कराजला बक्षीस म्हणून 4.15 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर (सुमारे 26 कोटी भारतीय रुपये) मिळाले. त्याच्या तुलनेत, आयपीएल 2025 मध्ये विजेत्या ठरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाला 20 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले होते. म्हणजेच अल्कराजला एकट्याला आयपीएल विजेत्या टीमपेक्षा 6 कोटी रुपये जास्त मिळाले आहेत.
अंतिम सामन्यात अल्कराजने 38 वर्षीय जोकोविचचा 2-6, 6-2, 6-3, 7-5 असा चार सेटमध्ये पराभव केला. पहिल्या सेटमध्ये जोकोविचने 6-2ने विजय मिळवून वर्चस्व गाजवले होते. मात्र, त्यानंतर अल्कराजने जबरदस्त पुनरागमन करत पुढचे तिन्ही सेट जिंकले आणि जेतेपदावर नाव कोरले. शेवटच्या सेटमध्ये जोकोविचने कडवी झुंज दिली, पण अल्कारेजने 7-5 ने बाजी मारली.
ऑस्ट्रेलियन ओपन जिंकताच अल्कराजच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने आतापर्यंतची चारी ग्रँड स्लॅम (ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि यूएस ओपन) जिंकली आहेत. चारी ग्रँड स्लॅम जिंकणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.





