मुंबई । भारताचा युवा फिरकीपटू युजवेंद्र चहल हा आपल्या जादूई फिरकी गोलंदाजीने विरोधी संघाच्या फलंदाजाची भंबेरी उडवून टाकतो. सध्या लॉकडाउन असल्याने तो सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सबरोबर संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. यासोबतच तो टिक टॉकवर अनेक गमतीशीर व्हिडिओ तयार करून फॅन्सबरोबर शेअर करतो. त्याचे टिक टॉक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत.
दरम्यान एका कार्यक्रमात चहलने 2017 साली ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला होता, त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला बाद करण्याची एमएस धोनीची रणनीती कशी यशस्वी ठरली याचा किस्सा चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
5 सामन्यांच्या या वनडे मालिकेत चहलने सलग तीन वेळा मॅक्सवेलला बाद केले होते. या मालिकेत ग्लेन मॅक्सवेल विरुद्ध युजवेंद्र चहल अशी चांगलीच जुगलबंदी रंगली होती.
ग्लेन मॅक्सवेलला नियोजनपूर्वक कसे बाद केले हे सांगताना चहल म्हणाला, “ग्लेन मॅक्सवेलला नेहमी स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत होतो. स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकल्याने तो बाद व्हायचा. असा चेंडू टाकण्यासाठी मला एमएस धोनीने सांगितले होते. त्यानुसार मी त्याला चेंडू टाकला आणि सलग तीन सामन्यात बाद केले.
“या दौऱ्यावर येण्यापूर्वी मॅक्सवेल फॉर्ममध्ये नव्हता. माझ्या गोलंदाजीवर तो आक्रमक फटके खेळण्यासाठी उत्सुक असायचा. पण मी नेहमीच त्याला स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकायचो. आयपीएलमध्येही मी त्याला बाद केले होते.”
चहलने मॅक्सवेलला वनडेमध्ये चारवेळा, टी20 मध्ये तीन वेळा तर आयपीएलमध्ये दोन वेळा बाद केले आहे. 2017 साली झालेल्या या वनडे मालिकेत भारताने 4-1 अशा फरकाने विजय मिळवला होता.
ट्रेंडिंग घडामोडी –
पाकिस्तानचा खेळाडूही बनलाय रोहितचा मोठा चाहता; म्हणतोय, आता मलाही…
ताशी १५४.४ किमी वेगाने गोलंदाजी करणारा ‘तो’ भारतीय गोलंदाज म्हणून झाला लवकर निवृत्त
सराव शिबीरात धोनी दिसणार का? पहा हे ५ तज्ञ खेळाडू काय म्हणताय