भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एम एस धोनी २०१९ मध्ये होण्याऱ्या विश्वचषकासाठी यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती असेल असे निवड समिती अध्यक्ष्य एम एस के प्रसाद यांनी सांगितले आहे. धोनी जगातील अव्वल यष्टीरक्षक असल्याचेही ते म्हणाले आहेत.
धोनीने कालच आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची १३ वर्ष पूर्ण केली आहेत. त्याने १३ वर्षाच्या कारकिर्दीत ४८७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने एकूण १६,१२२ धावा केल्या आहेत तसेच यष्टीरक्षक म्हणून ७६८ विकेट्स घेतल्या आहेत.
प्रसाद यांना धोनीबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले ” आम्ही भारत अ संघात काही यष्टिरक्षकांची तयारी करून घेत आहोत; पण तरीही आम्ही धोनीला विश्वचषकापर्यंत कायम ठेवण्याचा आमचा विचार पक्का ठेवला आहे. विश्वचषकानंतर आम्ही दुसऱ्या यष्टिरक्षकांची तयारी करू.”
“माझ्या मते एम एस धोनी अजूनही जगातला अव्वल क्रमांकाचा यष्टीरक्षक आहे. आम्ही हे नेहमीच म्हणत आलो आहोत. सध्या चालू असलेल्या टी २० मालिकेत त्याने केलेले स्टम्पिंग आणि यष्टी मागील झेल अभूतपूर्व होते.” अशा शब्दात प्रसाद यांनी धोनीचे कौतुक केले.
तरुण यष्टिरक्षकांबद्दल प्रसाद म्हणाले. ” मला भारतीय क्रिकेटच नाही तर क्रिकेट जगतातील कोणताही यष्टीरक्षक धोनीच्या जवळपासही येताना दिसत नाही आणि यात कसलीच तुलना नाही”
याबरोबरच रिषभ पंत आणि संजू सॅमसन या नवोदित यष्टिरक्षकांबद्दल प्रसाद यांनी सांगितले, “मी तुम्हाला मोकळेपणाने सांगतो, त्यांनी अजूनही आम्हाला अपेक्षित असणारा स्थर गाठलेला नाही. आम्ही त्यांना भारत अ संघात संधी देत आहोत आणि त्यांची तयारीही पाहत आहोत.”