– नचिकेत धारणकर
चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीचा थरार आजपासून अनुभवायला मिळणार आहे. अनेक उलटफेरांनंतर पॅरिस सेंट जर्मन (पीएसजी), लाइपझीग, बायर्न मुनिख आणि लिओन या चार संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. पहिला सामना लाइपझीग विरुद्ध पीएसजी तर दुसरा सामना लिओन विरुद्ध बायर्न होणार आहे.
केवळ ११ वर्षापूर्वी स्थापन झालेल्या लाइपझीग क्लबने चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत धडक मारत सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. या संघाने मागील ६ सामन्यांपैकी ५ सामन्यात पहिला गोल केला आहे. या संघाचे प्रशिक्षक ज्युलियन नॅगलस्मन हे तर फक्त ३३ वर्षाचे असल्याने चॅम्पियन्स लीग च्या उपांत्य फेरीत पोहचणारे सर्वात तरुण मॅनेजर ठरले आहेत.या हंगामात चॅम्पियन्स लीग खेळणाऱ्या खेळाडूंपैकी तब्बल ६३ खेळाडू नॅगलस्मन यांच्यापेक्षा वयाने मोठे होते.
आज लाइपझीग समोर पीएसजीचे तगडे आव्हान असेल. पीएसजीचे एम्बाप्पे आणि नेमार लयीत असल्याने त्यांना रोखण्याचे आव्हान लाइपझीग समोर असेल. एम्बाप्पेने मागील ८ सामन्यात ५ गोल आणि ५ असिस्ट नोंदवले आहेत. तब्बल २५ वर्षानंतर उपांत्य फेरीत पोहचलेल्या पीएसजी संघासाठी अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.
तर दुसरा सामना लिओन विरुद्ध बायर्न होणार आहे. बार्सिलोनाचा ८-२ ने पराभव केलेला बायर्नचा संघ या वर्षीच्या चॅम्पियन्स लीगच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजला जातो आहे. तर लिओनने बलाढ्य मँचेस्टर सिटीला घरचा रस्ता दाखवत त्यांना कमी समजण्याची चूक करू नका असा इशारा दिला आहे. बायर्नला या हंगामात अजून एकदा सुद्धा पराभवाचे तोंड पहावे लागले नाही आहे. त्यांनी ९ मधून ९ सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच या हंगामात त्यांनी तब्बल ३९ गोल केले आहेत. लिओन संघाने या हंगामात १४ गोल केले आहेत आणि विशेष म्हणजे बायर्न तर्फे एकट्या लेवान्डोस्कीनेच १४ गोल केले आहेत. लिओन संघाला या हंगामात ४ विजय तर ३ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.