आयसीसीनं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बाबत सुरू असलेला वाद सोडवला आहे. बोर्डानं भारत आणि पाकिस्तानला डोळ्यासमोर ठेवून स्पर्धेच्या हायब्रीड मॉडेलला मान्यता दिली. हे दोन्ही देशांत होणाऱ्या स्पर्धांसाठी लागू आहे.
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत-पाकिस्तान सामन्याची नवी तारीख समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 फेब्रुवारीला सामना होणार असल्याचा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. याआधी उभय संघांमधील सामन्याची आणखी एक तारीख समोर आली होती. हा सामना 1 मार्चला होणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु आता ‘एनडीटीव्ही’च्या एका बातमीनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 23 फेब्रुवारीला खेळला जाऊ शकतो. याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. आयसीसीनं अद्याप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर केलेलं नाही.
2025 चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार आहे. परंतु टीम इंडिया आपले सामने इतर ठिकाणी खेळेल. यावर अद्याप निर्णय झालेला नाही. आयसीसी लवकरच पाकिस्तानच्या सह-यजमान देशाची घोषणा करणार आहे. हे देश श्रीलंका किंवा यूएई असू शकतात. यूएईची निवड झाल्यास हा सामना दुबईत खेळला जाऊ शकतो. श्रीलंकेची निवड आल्यास हे ठिकाण कोलंबो असू शकतं.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बीसीसीआय टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यास तयार नव्हती. तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डही हायब्रिड मॉडेल न स्वीकारण्यावर ठाम होतं. पण शेवटी पीसीबीनं होकार दिला. यासाठी त्यांनी काही अटी ठेवल्या होत्या. आयसीसीनं त्या मान्य केल्या आहेत.
पाकिस्ताननं अट घातली होती की, जर टीम इंडिया पाकिस्तानात खेळली नाही तर ते देखील भारतात खेळणार नाहीत. आयसीसीनं ही अट मान्य केली आहे. आता 2027 पर्यंत दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धांसाठी हायब्रीड मॉडेल लागू केलं जाणार आहे.
हेही वाचा –
मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत चिंता, बंगालच्या या निर्णयामुळे चाहत्यांची धाकधूक वाढली
आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडिया! जेतेपदासाठी या खतरनाक संघाशी लढत
“तेव्हा विराट कोहली अक्षरश: रडणार होता…”, बॉलिवूड अभिनेत्यानं केला धक्कादायक खुलासा