पुढील महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सर्व देशांना 12 जानेवारीपर्यंत आपले संघ घोषित करायचे आहेत. भारतीय निवड समितीही या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी मजबूत संघ निवडण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, संघ निवडीपूर्वी बीसीसीआयसमोर अनेक प्रश्न आहेत, ज्याची उत्तरं बोर्डाला शोधावी लागतील. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा अलिकडचा फॉर्म खराब असला, तरी ते वनडे संघात राहणार आहेत. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी केएल राहुल, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांच्या जागा धोक्यात आल्याचं कळतंय.
‘पीटीआय’नं दिलेल्या वृत्तानुसार, केएल राहुलची संघात निवड निश्चित नाही. यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवड समितीची पहिली पसंती रिषभ पंतला आहे. जर राहुलनं विकेटकीपिंग केली नाही, तर त्याला संघात स्थान मिळणार नाही. अशा परिस्थितीत त्याची बॅकअप म्हणून निवड होणंही कठीण आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यामुळे संजू सॅमसनला संघात स्थान मिळू शकतं. गंभीरची पसंती सॅमसनला आहे.
दुसरीकडे, मोहम्मद शमीच्या फिटनेस बाबतही फारसं अपडेट मिळालेलं नाही. तो पूर्णपणे फिट नसल्यामुळे त्याची बॉर्डर-गावस्कर मालिकेत निवड झाली नव्हती. मात्र या दरम्यान सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, शमी सातत्यानं देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. जर जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होऊ शकला नाही किंवा त्याचं खेळणं संशयास्पद असंल, तर शमी भारतासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजाची फलंदाजी आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या या फॉरमॅटमधील जागेवरही विचार करावा लागेल. अलीकडच्या काळात अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोन अष्टपैलू खेळाडू उदयास आले, ज्यांनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी संघात स्थान मिळवण्यासाठी अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांच्यात चढाओढ असून यात अक्षरचं पारडं जड मानलं जात आहे.
हेही वाचा –
बुमराह नाही, तर हा खेळाडू होणार रोहित शर्मानंतर भारताचा पुढील कर्णधार; माजी खेळाडूचा धक्कादायक दावा!
आयसीसी रँकिंगमध्ये रिषभ पंतला मोठा फायदा, जसप्रीत बुमराहने इतिहास रचला!
मोहम्मद शमी कमबॅकसाठी तयार, व्हिडिओ पोस्ट करून दिला निवड समितीला संदेश! आता तरी संधी मिळणार का?