जगभरातील क्रिकेट चाहते ज्याची आतुरतेनं वाट पाहत होते, अखेर त्याची घोषणा झाली आहे. आयसीसीनं मंगळवारी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं वेळापत्रक जाहीर केलं. ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये हायब्रीड मॉडेलनुसार आयोजित होणार आहे. भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत होतील.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, जर पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे सामना नियोजित दिवशी झाला नाही तर काय होईल? अशा परिस्थितीत चाहत्यांची मजा खराब होऊ नये यासाठी आयसीसीनं स्पर्धेची बाद फेरी आणि अंतिम सामन्यांसाठी विशेष व्यवस्था केली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळला जाईल. ही 50 षटकांची स्पर्धा पाकिस्तान आणि दुबईमध्ये आयोजित होणार आहे, ज्यामध्ये एकूण 15 सामने खेळले जातील. टीम इंडिया आपले तीन साखळी सामने दुबईत खेळणार असून पहिला उपांत्य सामनाही दुबईत होणार आहे. पाकिस्तानातील सामने रावळपिंडी, लाहोर आणि कराची येथे आयोजित केले जातील. येथे प्रत्येकी तीन साखळी सामने होतील. साखळी सामन्यांव्यतिरिक्त स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना लाहोरमध्ये खेळला जाईल. जर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला नाही तर अंतिम सामना देखील लाहोरमध्येच होईल.
आता चाहत्यांना बाद फेरी किंवा अंतिम सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास चिंता करण्याची गरज नाही. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पहिला उपांत्य सामना दुबईत 4 मार्चला तर दुसरा उपांत्य सामना 5 मार्चला लाहोरमध्ये होईल. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत तीन दिवसांचं अंतर असेल आणि जर बाद फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाला तर सामना राखीव दिवशी खेळला जाईल.
चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलचे ठिकाण भारताच्या कामगिरीवर अवलंबून असेल. जर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर फायनल दुबईत होईल अन्यथा फायनलचं आयोजन लाहोरमध्ये केलं जाईल. जर 9 मार्च रोजीचा अंतिम सामना रद्द झाला, तर दोन्ही संघ 10 मार्च रोजी राखीव दिवशी सामना खेळतील.
हेही वाचा –
मेलबर्न कसोटीपूर्वी कर्णधार रोहित शर्माबाबत आलं मोठं अपडेट, आता टीम इंडियाचं चित्र बदलणार!
संघाला धक्का! दिग्गज फिरकीपटू बॉक्सिंग डे कसोटीमधून बाहेर, कारण जाणून घ्या
विराट कोहलीपासून रोहित शर्मापर्यंत, 5 क्रिकेटपटू ज्यांच्या घरी यावर्षी पाळणा हलला