मुंबई:- बाबुराव चांदेरे फाऊंडेशन, जॉली स्पोर्टस् यांच्या साखळीतील पहिल्या पराभवानंतर आज मिळविलेल्या विजयाने अमरहिंद मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील बाद फेरी गाठण्याच्या आशा पल्लवित केल्या. दादर, गोखले रोड(प.) येथील मंडळाच्या पटांगणातील मॅट वर सुरू असलेल्या “स्व. उमेश शेणॉय स्मृती चषक” पुरुषांच्या ब गटात पुण्याच्या चांदेरे फाऊंडेशनने उपनगराच्या चेंबूर क्रीडा केंद्राचा ६०-१५असा धुव्वा उडविला. आक्रमक सुरुवात करीत चांदेरे संघाने पूर्वार्धातच ३ लोण देत ३७-१० अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात आणखी २लोण देत गुणांचे अर्धशतक पार केले. पुणेकरांच्या या विजयात तेजस काळभोर याने ९ चढाया करीत झटापटीचे १२ आणि ३ बोनस असे १५ गुण मिळविले. त्याची एकदाही पकड झाली नाही. अजित चौहानने १ बोनस व १५ झटापटीचे असे १६ गुण वसूल केले. त्याचीही पकड झाली नाही. सुरेश जाधवने ५ पकडी करीत त्यांना उत्तम साथ दिली. चेंबर क्रीडाचा आकाश कदम एकाकी लढला.
उपनगराच्या जॉली स्पोर्टस् ने मुंबईच्या विजय क्लब वर ३४-३० अशी मात केली. सुरुवात आक्रमक करीत जॉलीने सलग ५ गुण घेत आपला इरादा स्पष्ट केला. पण त्याने खचून न जाता विजयने सलग गुण घेत जॉली वर पहिला लोण देत आघाडी घेतली. पुन्हा जॉलीने प्रतिहल्ला करीत विजय वर लोण दिला आणि विश्रांतीला २०-१५ अशी आघाडी घेतली. विश्रांतीनंतर देखील सामना चुरशीने खेळाला गेला. गुणफलक सतत दोलायमान स्थितीत सरकत होता. शेवटच्या मिनिटात अजिंक्य कापरे याची झालेली पकड विजय क्लबला पराभवाच्या गर्तेत घेऊन गेली. जॉलीच्या विजयात रजत सिंगने १८ चढाया करीत १ बोनससह १२ झटापटीचे गुण घेत महत्वाचा वाटा उचलला. त्याला विक्रम जाधव, अभिषेक नरची उत्तम साथ लाभली. विजय कडून कापरेने २१ चढाया करीत १बोनस व १३ झटापटीचे असे १४गुण घेत शर्थीचे लढत दिली. पण ५वेळा त्याची पकड झाली. ठाण्याच्या श्री विठ्ठलने ड गटात पहिल्या डावातील २४-२६ अशा पिछाडी वरून मुंबईच्या बंड्या मारुतीला ४३-४३ असे बरोबरीत रोखले. अक्षय मकवाना, चिन्मय गुरव, अनिकेत दळवी श्री विठ्ठल कडून, तर निलेश लाड, विनोद अत्याळकर, जितेश सापते बड्या मारुती कडून उत्कृष्ट खेळले.
इतर निकाल संक्षिप्त
१)जय भारत वि. वि. श्रीराम संघ(३९-३६), २) गोलफादेवी वि. वि. ओवळी मंडळ(३६-२८), ३)मिड लाईन वि. वि. विजय स्पोर्टस् (४२-२५).
महत्वाच्या बातम्या –
खेलो इंडिया युथ गेम्स । हरयाणा, राजस्थान संघांकडून महाराष्ट्र पराभूत
AUS vs WI 1st Test । लाईव्ह सामन्यातील स्मिथचं ‘हे’ काम नेहमी लक्षात राहणार! नवख्या खेळाडूसोबत काय केलं पाहाच