बीसीसीआयच्या (BCCI) आदेशानुसार कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजुर रहमानला संघातून मुक्त (Release) केले आहे. केकेआरने त्याला 9.20 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मात्र, बांगलादेशमध्ये दोन हिंदू तरुणांच्या हत्येनंतर बांगलादेशी खेळाडूंना आयपीएलमध्ये घेण्यावरून केकेआरवर कडाडून टीका होत होती.
आता या प्रकरणाचे पडसाद टी-20 वर्ल्ड कप 2026 वर पडताना दिसत असून, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) तातडीची बैठक बोलावली आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतीय वेळेनुसार आज रात्री 8.30 वाजता एक आपत्कालीन बैठक बोलावली आहे. यामध्ये टी-20 वर्ल्ड कप 2026 बाबत बोर्ड आपली भूमिका स्पष्ट करेल. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की, बांगलादेश आपले पथक भारतात न पाठवण्याचा मोठा निर्णय घेऊ शकते.
जर भारताने सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशच्या सामन्यांचे यजमानपद स्वीकारण्यास नकार दिला, तर पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशचे सर्व सामने श्रीलंकेत हलवले जाऊ शकतात. टी-20 वर्ल्ड कप 2026 भारत आणि श्रीलंका या दोन देशांत मिळून 8 मैदानांवर होणार आहे.
बांगलादेशच्या गटात इंग्लंड, इटली, नेपाळ आणि वेस्ट इंडिज हे संघ आहेत. त्यांचे 4 पैकी 3 सामने कोलकाता येथे होणार आहेत.
7 फेब्रुवारी: बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज (ईडन गार्डन्स, कोलकाता)
9 फेब्रुवारी: बांगलादेश विरुद्ध इटली (ईडन गार्डन्स, कोलकाता)
14 फेब्रुवारी: बांगलादेश विरुद्ध इंग्लंड (ईडन गार्डन्स, कोलकाता)
17 फेब्रुवारी: बांगलादेश विरुद्ध नेपाळ (वानखेडे स्टेडियम, मुंबई)
टी-20 वर्ल्ड कप सुरू व्हायला आता फक्त एक महिना शिल्लक आहे. जर बांगलादेशचे सामने श्रीलंकेत हलवले, तर त्यांच्या गटातील इतर 4 संघांनाही केवळ एक सामना खेळण्यासाठी श्रीलंकेला प्रवास करावा लागेल. यामुळे सर्वच संघांच्या प्रवासाचे आणि सरावाचे नियोजन विस्कळीत होऊ शकते.






