इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात रविवारपासून (१९ सप्टेंबर) दुबईतील सामन्याने होणार आहे. या सामन्यात आयपीएलचे २ सर्वात यशस्वी संघ अर्थातच चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स संघ आमनेसामने येणार आहेत. यापूर्वी पहिल्या टप्प्यातही उभय संघांमध्ये भिंडत झाली होती. हा सामना मुंबईने ४ विकेट्सने जिंकला होता. त्यामुळे यावेळी चेन्नई संघ या पराभवाचा वचपा काढण्याच्या प्रयत्नात असेल. अशात कर्णधार एमएस धोनी अंतिम एकादशमध्ये कोणाला जागा देईल? याची सर्वांना आतुरता असेल.
दुर्दैवाची बाब म्हणजे, चेन्नईच्या २ मॅच विनर परदेशी खेळाडूंना या सामन्यातून बाहेर राहावे लागू शकते. यामध्ये दक्षिण आफ्रिकाचा दिग्गज फलंदाज फाफ डू प्लेसिस आणि इंग्लंडचा युवा अष्टपैलू सॅम करन यांचा समावेश आहे. डू प्लेसिस सध्या कंबरेच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. याच कारणास्तव तो कॅरेबियन प्रीमियर लीगच्या उपांत्य फेरी सामन्यात खेळला नव्हता. त्यामुळे तो आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांनाही मुकण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे सॅम नुकताच (१५ सप्टेंबर) युएईला पोहोचला आहे. त्यामुळे त्याला कोविड नियमांनुसार ६ दिवस म्हणजेच २१ सप्टेंबरपर्यंत क्वारंटाईनमध्ये राहावे लागू शकते. हेच कारण आहे की, तो मुंबईविरुद्धच्या सामन्याला मुकू शकतो.
अशात कर्णधार धोनी डू प्लेसिसच्या जागी रॉबिन उथप्पा ऋतुराज गायकवाडसोबत सलामीला फलंदाजीसाठी पाठवू शकतो. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर अष्टपैलू मोईन अली असेल. तर सुरेश रैना, अंबाती रायुडू, एमएस धोनी आणि रविंद्र जडेजा मधल्या फळीला अजून मजबूत बनवतील. खालच्या फळीत अष्टपैलू ड्वेन ब्रावो आणि शार्दुल ठाकूरला ठेवले जाईल.
जडेजा, ब्रावो आणि शार्दुल हे तिघे गोलंदाजीतही योगदान देतील. त्यांच्यासोबत दिपक चाहरही गोलंदाजी विभागात असेल. याखेरीज दुबईच्या खेळपट्टीची स्थिती पाहता कर्णधार धोनी एका अतिरिक्त फिरकीपटूला खेळवू शकतो. अशावेळी इमरान ताहिरला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळू शकते. हेच जर खेळपट्टी वेगवान गोलंदाजीस पोषख असल्यास लुंगी एन्गिडी अंतिम ११ मध्ये असू शकतो.