चेन्नई, १ फेब्रुवारी : हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल)च्या प्ले ऑफच्या शर्यतीतून एकेक स्पर्धक बाद होत चालला आहे. ओडिशा एफसी या शर्यतीत आता काठावर आहेत आणि सलग दोन पराभवानंतर त्यांना विजय मिळवून सहाव्या क्रमांकावर पुन्हा येण्याची संधी आहे. त्यांच्यासमोर गुरुवारी चेन्नईयन एफसीचे आव्हान आहे आणि चेन्नईच्या घरच्या मैदानावर ही लढत होणार आहे. यजमान चेन्नईयन एफसीला मागच्या सामन्यात हार पत्करावी लागल्यामुळे खूप मोठा फटका बसला.
थॉमक ब्रॅडरिचचा हा संघ मागील सहा सामन्यांत एकही विजय मिळवू शकलेला नाही आणि त्यांच्या प्ले ऑफच्या उरल्या सुरल्या आशा उर्वरित लढतीतील कामगिरीवर व प्रतिस्पर्धी च्या आकडेवारीवर अवलंबून आहेत. मागील आठवड्यात बंगळुरू एफसीने ३-१ अशा फरकाने त्यांना पराभूत करताना ओडिशा एफसीला मागे टाकून तालिकेत सहावे स्थान पटकावले. घरच्या मैदानावरील चैन्नईयनची यंदाच्या पर्वातील कामगिरीही चिंताजनक आहे. त्यांना सातपैकी केवळ एकच विजय मिळवता आला आहे. पीटर स्लिस्कोव्हिचचे अपयश हे संघासाठी घातक ठरत आहे. नोव्हेंबर २०२२ नंतर तो पुन्हा सलग दोन सामन्यांत गोल करण्यात अपयशी ठरला आहे.
बंगळुरू एफसीविरुद्धच्या सामन्यात अल खयातीने पुनरागमन केले आणि ही चेन्नईयनसाठी चांगली गोष्ट आहे. दुखापतीमुळे त्याला मैदानाबाहेर बसावे लागले होते. ब्रॅडरिच हे उद्याच्या सामन्यात अल खयातीला प्लेइंग इलेव्हनमध्ये उतरवण्याची शक्यता आहे.
”सामन्यापूर्वी सर्व खेळाडूंसोबत एक मिटिंग घेतली आणि अखेरच्या पाच सामन्यातून कशी संधी आहे, यावर चर्चा केली. सर्वकाही ठरल्याप्रमाणे झाल्यास आम्ही १५ गुणांची कमाई करू शकतो आणि ते महत्त्वाचे आहे. आम्ही खडतर परिस्थितीतून सुरुवात केली आहे. आता आमच्याकडे पुरेसा अनुभव आला आहे आणि या अनुभवाचा उपयोग करून गुण मिळवण्याची हिच ती वेळ आहे. मला खेळाडूंवर विश्वास आहे,”असे ब्रॅडरिच म्हणाले.
हिरो आयएसएलमध्ये विश्रांतीनंतर मैदानावर उतरलेल्या ओडिशा एफसीला चांगली सुरुवात करता आली नाही. मागील आठवड्यात एटीके मोहन बागानने २-० अशा फरकाने त्यांना पराभूत केले होते. जोसेफ गोम्बाऊच्या संघाने मागील पाचपैकी चार सामन्यांत पराभव पत्करला आहे आणि त्यामुळे प्ले ऑफच्या शर्यतीत ते काठावर ढकलले गेले आहेत. एफसी गोवा आणि बंगळुरू एफसीने याचवेळी संधी साधून आगेकूच केली आहे.
डिएगो मॉरिसिओ आणि नंदाकुमार सेकर हे क्लबचा पाठीचा कणा आहेत. या पर्वाच्या सुरूवातीला जेव्हा ओडिशाचा सामना चेन्नईयनशी झाला होता, तेव्हा या दोघांनीच गोल केले होते. मॉरिसिओने मागील पाच सामन्यांत पाच गोल केले आहेत. सेकरने पाच सामन्यांत दोन गोल केले आहेत. रायनीएर फर्नांडिस यानेही मधल्या फळीत उल्लेखनीय योगदान दिले आहे. मागील आठवड्यात त्याला दुखापत झाली आहे आणि २० मिनिटानंतर तो मैदानाबाहेर गेला होता. पर्वाच्या महत्त्वाच्या टप्प्यात त्याने तंदुरुस्त रहावे अशी गोम्बाऊ यांची इच्छा आहे.
”आम्हाला स्पर्धात्मक आणि कणखर मानसिकतेने मैदानावर खेळ करायला हवा. आता या पर्वात आम्हाला करा किंवा मरा या मार्गातून जावे लागणार आहे. आमच्या हातात पाच सामने आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचे ध्येय आहे. चेन्नईयनचाही प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे दोघांसाठी हा सामना तितकाच महत्त्वाचा आहे,”असे गोम्बाऊ म्हणाले. उभय संघांमध्ये हिरो आयएसएलमध्ये झालेल्या सातपैकी प्रत्येकी दोन सामने या संघांनी जिंकले आहेत. (Chennaiyin FC will clash with Odisha FC in a do-or-die situation)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडचे टीम इंडियासमोर लोटांगण! पाहुण्यांचा 66 धावांवर खुर्दा उडवत मालिका भारताच्या नावे
वन ऍण्ड ओन्ली हार्दिक! टी20 क्रिकेटमध्ये पंड्याशिवाय ‘त्या’ कामगिरीच्या जवळपासही कोणी नाही