दोन दिवसांपूर्वी चेन्नई येथे आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा खेळाडूंचा लिलाव पार पडला. या लिलावादरम्यान अनेक खेळाडू कोट्याधीश झाले. तर, काही नवख्या खेळाडूंनाही सर्व फ्रँचायझींनी आपल्या संघात स्थान दिले. सौराष्ट्राचा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया याला देखील राजस्थान रॉयल्सने १ कोटी २० लाख रुपयांच्या किंमतीत विकत घेतले. या निवडीनंतर चेतनने आपली कारकीर्द भारताचा अव्वल अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या एका सल्ल्यामुळे मार्गी लागल्याचे म्हटले आहे.
चेतनवर लावली राजस्थानने बोली
सौराष्ट्रसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणारा चेतन डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. नुकत्याच संपलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीमुळे राजस्थान रॉयल्सने आयपीएल लिलावात त्याच्यावर बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. त्यामुळे आता २२ वर्षीय चेतन प्रथमच आयपीएलमध्ये सहभागी होईल.
जडेजाचे मानले आभार
आयपीएल निवडीनंतर चेतनने एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्यामध्ये त्याने आतापर्यंतच्या आपल्या प्रवासात मदत केलेल्या सर्वांचे आभार मानले. भारताचा प्रमुख अष्टपैलू व सौराष्ट्राचा वरिष्ठ खेळाडू रवींद्र जडेजा याच्या एका सल्ल्यामुळे आपले आयुष्य बदलले असे, चेतनने म्हटले.
यासंबंधीची आठवण सांगताना तो म्हणाला, “सन २०१७-२०१८ च्या विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यातून मी पदार्पण केले. जड्डू भाई या सामन्यात दुखापतीमुळे खेळत नव्हता. सुरूवातीची काही षटके माझ्याकडून मनासारखी गोलंदाजी झाली नाही. माझ्या चेंडूचा टप्पा व्यवस्थित पडत नव्हता. तेव्हा दुखापत असतानाही, जड्डू भाई मैदानात आला आणि मला म्हणाला, मी समजू शकतो तुझ्या पहिल्या सामन्यामुळे तू दबावात असतील. तू खराब कामगिरी केली तर जास्तीत जास्त संघाबाहेर जाशील. मात्र, आता तू मैदानात आहेस आणि त्यामुळे आता शांतचित्ताने गोलंदाजी कर. त्याच्या या सल्ल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला आणि मी दोन बळी मिळवले.”
चेतनने या मुलाखतीत जडेजा व्यतिरिक्त जयदेव उनाडकट, चेतेश्वर पुजारा व शेल्डन जॅक्सन यांचेदेखील आभार मानले.
अशी राहिली आहे आत्तापर्यंतची कारकीर्द
आयपीएल लिलावात कोट्यधीश झालेल्या चेतन सकारिया याचा आतापर्यंतचा प्रवास खूप कठीण होता. गुजरातच्या वरतेजमध्ये राहणाऱ्या चेतनच्या भावाने मागच्या महिन्यात आत्महत्या केली होती. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्याचे वडील टेम्पो चालवत असे. क्रिकेट सामने पाहण्यासाठी चेतनच्या घरात टी.व्ही. नसल्यामुळे तो आपल्या मित्रांच्या घरी जाऊन सामने पाहत असे.
तरीही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून कष्टाने पुढे येत चेतनने अगदी कमी वयात सौराष्ट्राच्या संघात आपली जागा कमावली आहे. स्विंग गोलंदाजी करण्यात माहीर असणाऱ्या चेतनने आतापर्यंत १५ प्रथम श्रेणी सामन्यात ४१ तर, १६ टी२० सामन्यात अवघ्या ७.८ इतक्या इकॉनॉमी रेटने २८ बळी आपल्या नावे केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
टेम्पो चालकाचा मुलगा ते नेट बॉलर अन् आता आयपीएल गाजवण्यास सज्ज, पाहा कोण आहे तो?