मागील काही दिवसांपासून भारतीय संघाची नवी भिंत समजल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराच्या फलंदाजीला गंज लागला आहे. खराब फॉर्मशी झगडत असलेल्या चेतेश्वर पुजाराने जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या अंतिम सामन्यांतील दोन्ही डावांमध्ये चांगली फलंदाजी केली नाही. न्यूझीलंडच्या हातून ८ विकेट्सने कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर चेतेश्वर पुजाराच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.
याचदरम्यान दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने पुजाराच्या सुमार फलंदाजीमागील कारण सांगितले आहे. एका मुलाखतीत भारतीय कसोटी संघातील फलंदाजांच्या चूका सांगत असताना डेल स्टेनने पुजाराविषयीही प्रतिक्रिया दिली आहे.
चेतेश्वर पुजाराच्या फ्लॉप फलंदाजीमागील कारण
स्टेनचे मत आहे की, पुजारा सध्या बॅकफुटवर शॉट खेळत नाही आणि याच कारणामुळे आपल्या खेळाचा एक भाग हरवून बसला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोसोबत बोलत असताना स्टेनने पुजाराच्या फलंदाजीमधील मुख्य कमतरता सांगताना म्हटले की, “मला आठवते की पुजारा आपल्या पायांचा वापर करुन उत्कृष्ट पद्धतीने खेळतो. याव्यतिरिक्त तो कट शॉट आणि बॅकफुट ड्राईव्ह देखील उत्कृष्ट पद्धतीने खेळतो. पण आता तो असे शॉट खेळत नाही. सध्या तो कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात जो शॉट खेळून बाद झाला. तसाच शॉट जर काही वर्षांपुर्वी खेळण्याची वेळ आली असती; तर त्याने बॅकफुटवर जाऊन कव्हरच्या दिशेने शॉट मारला असता. मात्र यावेळी तो अर्धा फ्रंटफूटवर आणि अर्धा बॅकफूटवर असताना हा शॉट खेळला. एकूणच काय तर पुजारा सॉफ्ट आऊट झाला.”
पुजारा मागील काही महिन्यांपासून चांगली कामगिरी करू शकला नाही. जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यामध्येही पुजाराच्या फलंदाजीमुळे सर्वच निराश झाले आहेत. त्याने पहिला डावामध्ये 54 चेंडूमध्ये फक्त 8 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावांमध्ये 80 चेंडूवर फक्त 15 धावा केल्या होत्या.
पुजाराची कारकिर्द संपुष्टात येऊ शकते
जागतिक कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या मिळालेल्या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने संघामध्ये मोठे बदल होण्याचे संकेत दिले आहेत. अशामध्ये पुजाराची कारकीर्द संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत.
इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. जर पुजारा या कसोटी मालिकेमध्येही फ्लॉप झाला, तर यामध्ये कोणतीही शंका नाही की त्याला भारतीय कसोटी संघातून वगळण्यात येईल. पुजारा सध्या आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या सर्वात अवघड परिस्थितीतून जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी! ‘या’ टी२० लीगमध्ये युवराज, डिविलियर्स अन् गेल घालणार धुमाकूळ?
भारतातील पहिल्या ‘महिला’ क्रिकेट कोच, ज्यांनी ‘या’ भारतीय क्रिकेटरला शिकवली बॅट धरायला
कडक! फलंदाजाने षटकार खेचण्यासाठी फिरवली बॅट अन् चेंडूने उडवली थेट दांडी