भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम येथे एक कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना १ ते ५ जुलै दरम्यान खेळला जाणार आहे. यावेळी भारतीय संघात काही मोठे बदल दिसणार आहेत. या मालिकेसाठी मागील वर्षी संघात असलेल्या काही खेळाडूंची संघात निवड झाली नाही. असे अनेक खेळाडू संघाबाहेर होतात. त्यांना अंतिम अकरामध्ये स्थान मिळत नाही. त्यातील काही खेळाडू प्रथम श्रेणीमध्ये किंवा लीग सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत संघात पुनरागमन करतात. त्यातील एक महत्वाचे उदाहरण म्हणजे मिस्टर टेस्ट क्रिकेटर अर्थातच चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara).
पुजाराने अधिक मेहनत करत ज्याप्रकारे संघात स्थान निर्माण केले हे सगळ्यांसाठी आश्चर्यकारक ठरले आहे. त्याच्या संघपुनरागमनाचे कौतुक माजी अष्टपैलू मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) यानेही केले आहे. त्याने पुजाराकडून युवा खेळाडूंनी शिकावे असे मत मांडले आहे. पुजाराला काही सामन्यांपूर्वी संघातून वगळले होते. त्याच्याबरोबर अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा यांनाही संघातून काढले होते. त्यांनतर पुजाराने निराश न होता प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करत संघनिवडअधिकाऱ्यांना विचार करण्यास भाग पाडले.
राष्ट्रीय संघातून वगळ्यानंतर पुजाराने रणजी ट्रॉफीचे काही सामने खेळले होते. त्यानंतर तो काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला देखील गेला होता. ससेक्स या काउंटी क्लबकडून खेळताना त्याने लागोपाठ चार शतके ठोकली होती. त्याच्यामध्ये दोन द्विशतकांचा देखील समावेश आहे. काउंटीच्या प्रदर्शनाच्या जोरावर त्याला भारतीय संघाचे तिकिट मिळाले.
एनडीटीव्हीशी बोलताना कैफ म्हणाला, “तुम्ही पुजाराकडून खूप काही शिकू शकता. एका फलंदाजाला संघातून वगळ्यानंतर त्याने काय केले पाहिजे? तर तुम्ही रणजी, काउंटी खेळायला पाहिजे. त्यामध्ये धावांचा पाऊस पाडला पाहिजे. पुजाराने तेच केले आहे.”
“जो युवा खेळाडू संघातून वगळला जातो, त्याने पुजारासारखी कामगिरी करत संघात स्थान मिळवले पाहिजे. त्याने मागील दोन महिन्यांपासून जी मेहनत केली आहे ती सगळ्यांना दिसली असेलच. भारताचा तो एक प्रमुख खेळाडू असून तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याची दाट शक्यता आहे,” असेही कैफने पुढे म्हटले आहे.
भारतीय संघ मागील वर्षीच इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार होता. मात्र कोरोनामुळे संघ चार सामन्यांनतर मायदेशी परतला. त्यातील हा शेवटचा सामना असून या मालिकेत भारत २-१ असा पुढे आहे. हा सामना भारतीय संघ नवा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. त्याचा हा विदेशातील कर्णधार म्हणून पहिलाच सामना असणार आहे. या सामन्यात पुजाराने विशेष खेळी करावी हीच चाहत्यांची इच्छा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO। बटलरचा ‘हा’ सिक्स पाहून तुम्हीपण म्हणाल ‘नादच खुळा!’
टी२० विश्वचषकासाठी महान कर्णधाराने निवडली भारताची सलामी जोडी, रोहितसह ‘या’ फलंदाजाचं घेतलं नाव
रणजीच्या अंतिम सामन्यात सरफराजचे झुंजार शतक, शानदार खेळीनंतर भरून आले डोळे; पाहा Video