तब्बल सात वर्षांनंतर भारताचा कसोटी विशेषज्ञ फलंदाज चेतेश्वर पुजाराला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. गुरवारी चेन्नई येथे पार पडलेल्या आयपीएलच्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने पुजाराला त्याच्या ५० लाख रुपयाच्या मूळ किंमतीत खरेदी केले. यापूर्वी पुजाराने २०१४ साली आपला आयपीएलचा शेवटचा सामना खेळला होता.
कसोटी विशेषज्ञ असल्याने कुठल्याच संघाने पुजाराला बोली लावण्यात रस दाखवला नव्हता. त्याने आपला शेवटचा टी-२० सामना देखील २०२० साली खेळला होता. मात्र यावेळी तीन वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नईच्या संघाने अनपेक्षितपणे पुजाराला बोली लावत आपल्या संघात समाविष्ट करून घेतले.
पुजाराने दिली प्रतिक्रिया
चेन्नईच्या संघाने खरेदी केल्यानंतर पहिल्यांदाच पुजाराने आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुजाराने आपल्या सोशल मिडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. यात तो म्हणाला, “आयपीएलमध्ये पुनरागमन करत असल्याने मी खुश आहे. पिवळ्या जर्सीत खेळण्यासाठी मी तयार आहे. पुन्हा एकदा मी धोनी सोबत खेळणार आहे. ज्यावेळी मी पदार्पण केले होते, त्यावेळी धोनी कसोटी संघाचा कर्णधार होता. धोनीसोबत खेळण्याच्या अनेक आठवणी आहेत. त्यामुळे त्याच्यासोबत पुन्हा एकदा खेळण्यासाठी मी उत्सुक आहे.”
आयपीएलमध्ये वेगळ्या तंत्राने फलंदाजी करण्याबद्दल पण पुजाराने यावेळी आपले मत मांडले. तो म्हणाला, “आयपीएलमधली फलंदाजी निश्चितच कसोटी सामन्यातील फलंदाजीपेक्षा वेगळी असते. यात तुम्हाला वेळेनुसार तुमचा खेळ बदलावा लागतो. मी आयपीएलसाठी चांगली तयारी केली असून मी उत्तम प्रदर्शन करेल, अशी मला आशा आहे.”
पुजाराची आयपीएल कारकीर्द
भारताच्या कसोटी संघाचा अविभाज्य घटक असलेला पुजारा यापूर्वी अखेरच्या वेळी २०१४ साली आयपीएलमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी, त्याने किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तत्पूर्वी, पुजारा केकेआर व आरसीबी संघांसाठी आयपीएल खेळला आहे. पुजाराने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ३० सामने करताना ३९० धावा काढल्या आहेत. ज्यात एका अर्धशतकाचाही समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या:
कोलकाता नाईट रायडर्सच्या अष्टपैलूचा धक्कादायक निर्णय, आयपीएलसाठी घेणार कसोटी मालिकेतून माघार