अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. पुजारानं गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या अंतिम सामन्यात पुजारानं 41 धावा केल्या होत्या. यानंतर पुजाराला कसोटी संघातून वगळण्यात आलं.
आता भारताच्या या कसोटी विशेषज्ञ फलंदाजासाठी एक वाईट बातमी आहे. पुजारा पुढील वर्षी (2025 काउंटी चॅम्पियनशिप) काउंटी चॅम्पियनशिपसाठी ससेक्स संघात परतणार नाही. इंग्लिश क्लबनं ऑस्ट्रेलियाच्या डॅनियल ह्युजेसला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुजारासाठी संघाचे दरवाजे बंद झाले आहेत.
पुजारा 2024 मध्ये सलग तिसऱ्या हंगामात ससेक्सकडून खेळला होता. ह्यूज संघात येण्यापूर्वी त्यानं यावर्षी 7 चॅम्पियनशिप सामने खेळले होते. पुजारानं 2022-2024 दरम्यान 34 डावांमध्ये 74.80 च्या सरासरीनं 2244 धावा केल्या, ज्यात 10 शतकं आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
ससेक्सचे मुख्य प्रशिक्षक पॉल फारब्रेस यांनी अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या निवेदनात म्हटलं की, “चेतेश्वर पुजाराला करारातून मुक्त करणं सोपं काम नव्हतं. परंतु डॅनियल आमच्या गरजेनुसार संघात फिट बसतो. आम्हाला आनंद होत आहे की तो उर्वरित हंगामासाठी उपलब्ध असेल.” यंदाच्या ‘ब्लास्ट’च्या गट टप्प्यात ह्युजेसनं 43.07 च्या सरासरीनं 560 धावा केल्या, ज्यात 5 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 96 धावांची होती. तो चालू हंगामातील काउंटी चॅम्पियनशिपमधील उर्वरित 5 सामने खेळण्यासाठी उपलब्ध असेल.
36 वर्षीय चेतेश्वर पुजाराची कसोटी कारकीर्द चमकदार राहिली आहे. पुजारानं भारतासाठी आतापर्यंत 103 कसोटी सामन्यांमध्ये 43.60 च्या सरासरीनं 7195 धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून 19 शतकं आणि 35 अर्धशतकं निघाली. पुजारा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज आहे. त्यानं आतापर्यंत 271 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 20899 धावा केल्या आहेत. पुजारानं या कालावधीत 65 शतकं आणि 80 अर्धशतकं ठोकली आहेत. लिटिल मास्टर सुनील गावसकर हे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू आहेत. त्यांनी 348 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 51.46 च्या सरासरीनं 25834 धावा केल्या, ज्यात 81 शतके आणि 105 अर्धशतकांचा समावेश आहे.
हेही वाचा –
पुरुष संघाबरोबरच भारताचा महिला संघही पुढील वर्षी करणार इंग्लंडचा दौरा, पाहा वेळापत्रक
भारताच्या माजी खेळाडूच्या मुलाला मिळाली इंग्लंडकडून खेळण्याची संधी, श्रीलंकेविरुद्ध उतरला मैदानात
क्रिकेटमध्ये भारतीयांचा दबदबा! ऑस्ट्रेलियन संघात 3 भारतीय वंशाच्या खेळाडूंची एन्ट्री