भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर -गावसकर कसोटी मालिकेमध्ये कर्णधार अजिंक्यच्या नेतृत्वाखाली शानदार विजय मिळवला. फारसे आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या खेळाडूंना हाताशी धरत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव केला. ॲडीलेड येथे झालेल्या पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्यानंतर सर्व स्तरातून भारतीय संघावर टीका होत होती. मालिकेत भारतीय संघाचे पुनरागमन जवळपास अशक्य असल्याचे मानले जात होते. मात्र प्रमुख खेळाडूंना झालेली दुखापत व विराट कोहलीची पालकत्व रजादेखील अजिंक्यसेनेला रोखू शकली नाही व संघाने मालिकेत जबरदस्त पुनरागमन करत 2-1 ने विजय मिळवला.
या मालिकेमध्ये संपूर्ण संघाने एकजूट दाखवत उत्तम कामगिरी केली. संपूर्ण मालिकेत सर्वाधिक चर्चेत राहिला तो सिडनी येथील अनिर्णीत राहिलेला सामना. या सामन्यात विजयाच्या उंबरठ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला हनुमा विहारीच्या चिवट झुंजीमुळे विजयाची चव चाखता आली नाही.
मालिका संपल्यानंतर विहारीने एका मुलाखतीत सिडनी सामन्यातील आठवणी उलगडल्या आहेत. मुलाखती दरम्यान विहारी म्हणाला ” टी ब्रेक दरम्यान मी पेनकिलर इंजेक्शन घेतले होते. इंजेक्शन घेतल्यामुळे मला वेदना जाणवत नव्हती, पण माझा डावा पाय पूर्णपने सुन्न झाला होता. मला माझा पाय जाणवत देखील नव्हता.”
दुखापतग्रस्त असून देखील विहारीने सिडनी कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन सोबत जवळपास दीड सत्र फलंदाजी केली. विहारीने तब्बल 161 चेंडूचा सामना करत 23 धावांची नाबाद खेळी केली होती. सामन्याच्या पाचव्या दिवशी विहारीने दाखवलेल्या या झुंजार खेळीबद्दल संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून त्याचे कौतुक केले जात आहे.
विहारीने कसोटी कारकिर्दीत १२ सामने खेळले असून त्यात ३२.८४च्या सरासरीने ६२४ धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजीत ३६च्या सरासरीने ५ विकेट्स देखील घेतल्या आहेत. दुखापतग्रस्त असल्यामुळे विहारीच्या इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात निवड झाली नाही.