सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर असेलेला भारतीय संघ गुरुवारी दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना चेतेश्वर पुजाराचा भारतासाठी ५०वा कसोटी सामना असणार आहे. भारताच्या या नवीन वॉलने ऑक्टोबर २०१० मध्ये आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच ८९ चेंडूत ७२ धावा केल्या होत्या. त्याने पहिल्या सामन्यापासूनच आपली क्षमता दाखवून दिली होती. आता त्याच्या ५० व्या कसोटी सामन्याच्या निमित्ताने पाहुयात त्याने खेळलेल्या काही अप्रतिम कसोटी खेळी.
१५९ विरुद्ध न्यूझीलंड, हैदराबाद (२०१२)
हे पुजाराचे पहिले कसोटी शतक होते. या सामन्यात पुजारा २० महिन्यांनंतर संघात परतला होता आणि त्याने त्याचा परती चा सामना अविस्मरणीय बनवला. या सामन्यात त्याने भारताकडून त्या डावात सर्वाधिक धावा काढल्या होत्या. या सामन्यात भारताने न्यूझीलँडला १५१ धावांनी पराभूत केले होते.
२०६* विरुद्ध इंग्लंड, अहमदाबाद (२०१२)
या सामन्यात पुजाराने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले द्विशतक लगावले. पुजारा हा या संघाचा राहुल द्रविड होऊ शकतो हे त्याने या सामन्यात दाखवून दिले. पुजाऱ्याच्या या खेळी मुळेच भारताला ५२१ धावांचा डोंगर उभारता आला. फलंदाजीसाठी उत्तम अश्या खेळपट्टीवर इंगलंडने ही चांगली फलंदाजी केली पण पुजाराची फलंदाजी दोन्ही संघामधील फरक ठरली.
२०४ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, हैदराबाद (२०१३)
पुजाराने आपल्या ११ व्या सामन्यातच दुसरे कसोटी द्विशतक लगावले. मुरली विजय बरोबर त्याने दुसऱ्या विकेटसाठी विक्रमी ३७० धावांची नोंद केली. या सामन्यांमध्ये, पुजारा सर्वात जलद १००० कसोटी धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज बनला.
१४५* विरुद्ध श्रीलंका, कोलंबो (२०१५)
२०१४ मध्ये पुजारा खराब फॉर्ममुळॆ भारतीय कसोटी संघाच्या बाहेर गेला होता आणि पुन्हा एकदा कमबॅक करताना त्याने उत्कृष्ट खेळ केला. त्याला या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार ही मिळाला. सलामीला येऊन नाबाद परतणाऱ्या दिग्गजांच्या यादीत त्याने आपले नाव या सामन्यानंतर सामील करून घेतले. भारताला पुजाराने हा एकहाती विजय मिळवून दिला आणि भारताने २४ वर्ष नंतर श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकली.
९२ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, बंगलोर (२०१७)
पुजाराच्या मते त्याच्या दिवशतका पेक्षाही हा डाव महत्वाचा होता. या खेळीमुळे भारताला संकटांतून बाहेर काढता आले आणि विजयाचा मार्ग मोकळा झाला आणि पुजाराने राहणे बरोबर ११८ धावांची भागीदारी केली होती, या मालिकेतील ही पहिली शतकी भागीदारी होती. आणि याच भागीदारीमुळे भारत सामना जिंकू शकला.
२०२ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, रांची (२०१७)
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४५१ धावा केल्यानंतर पुजाराने भारताकडून २०२ धावांची मजल मारून दिली आणि असे करताना त्याने ५२५ चेंडूंचा सामना केला. याआधी कोणत्याही भारतीय फलंदाजाने फलंदाजी करताना ६८९ मिनिटे खेळपट्टीवर काढली नव्हती.