पुणे – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सामन्यात दिग्विजय पाटील ६३धावा, ओम भोसले ५२धावा यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर छत्रपती संभाजी किंग्स संघाने रायगड रॉयल्स संघाचा ३४ धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत छत्रपती संभाजी किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजी किंग्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६बाद २०३धावा केल्या. २००धावांचा टप्पा पार करणारा छत्रपती संभाजी किंग्स हा या मौसमातील पहिला संघ ठरला.
सौरभ नवले(०), मुर्तझा ट्रंकवाला(१०धावा) हे सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे छत्रपती संभाजी किंग्स संघ ४.४ षटकात २बाद ३१धावा अशा स्थितीत होता. त्यानंतर ओंकार खाटपेने ३५चेंडूत ४चौकार व १ षट्काराच्या साहाय्याने ४९ धावांची खेळी केली. त्याला दिग्विजय पाटीलने ३९चेंडूत ६३ धावांची आक्रमक खेळी करून साथ दिली. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार व २ षटकार खेचले. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ४९ चेंडूत ७२ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. विकी ओस्तवालने आपल्या गोलंदाजीवर ओंकार खाटपेला झेल बाद केले. त्यानंतर दिग्विजय पाटील व ओम भोसले(५२ धावा)यांनी चौथ्या गड्यासाठी ३३ चेंडूत ६० धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या मजबूत केली. पण ओम भोसलेने मारलेला चेंडू निखिल कदमने फॉलो थ्रू मध्ये अडवला व चपळाईने क्षेत्ररक्षण करून दिग्विजयला बाद केले.
ओम भोसलेने राजवर्धन हंगरगेकर(नाबाद ९)च्या समवेत पाचव्या विकेटसाठी १५ चेंडूत ३७ धावांची भागीदारी केली. ओम भोसलेने २४चेंडूत ५२ धावांची तडाखेबंद खेळी केली. तआक्रमक अर्धशतक ठोकताना ओमने ३चौकार व ४ षटकारांची आतषबाजी केली. ओमच्या अर्धशतकाने छत्रपती संभाजी किंग्स संघाने २० षटकात ६बाद २०३धावा अशी भक्कम धावसंख्या उभारली.
२०३ धावांचे आव्हान रायगड रॉयल्स संघ पेलू शकला नाही. त्यांचा डाव २० षटकात ९बाद १७०धावावर संपुष्टात आला. यात सिद्धेश वीर ३५, ऋषभ राठोड ३५, विकी ओस्तवाल १४, नौशाद शेख १३यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. छत्रपती संभाजी किंग्सकडून शामसुझमा काझी(३-३४), हितेश वाळुंज(२-२९), आनंद ठेंगे(२-३१)यांनी सुरेख गोलंदाजी केली.
संक्षिप्त धावफलक:
छत्रपती संभाजी किंग्स: २० षटकात ६बाद २०३धावा (दिग्विजय पाटील ६३(३९,७x४,२x६), ओम भोसले ५२(२४,३x४,४x६), ओंकार खाटपे ४९(३५,४x४,१x६), मुर्तझा ट्रंकवाला १०, विकी ओस्तवाल १-२५, ओमकार राजपूत १-३५, मनोज इंगळे १-३७, निखिल कदम १-३९) वि.वि. रायगड रॉयल्स:
२० षटकात ९बाद १७०धावा(सिद्धेश वीर ३५(२९,५x४), ऋषभ राठोड ३५(२३,२x४,२x६), विकी ओस्तवाल १४, नौशाद शेख १३, शामसुझमा काझी ३-३४, हितेश वाळुंज २-२९, आनंद ठेंगे २-३१, प्रणय सिंग १-२९, राजवर्धन हंगरगेकर १-३८); सामनावीर – ओम भोसले;
आजचे सामने
४ जून रत्नागिरी जेट्स वि. रायगड रॉयल्स दु. २ वा
४ जून कोल्हापूर टस्कर्स वि. पुणेरी बाप्पा सायं. ७ वा.