पुणे – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत पाचव्या दिवशी दुसऱ्या लढतीत राजवर्धन हंगर्गेकर(३-१८ व २३धावा) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर छत्रपती संभाजी किंग्स संघाने ईगल नाशिक टायटन्स संघाचा ४७ धावांनी पराभव करून दुसरा विजय मिळवला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुकेश चौधरीच्या दुसऱ्याच चेंडूवर मुर्तझा ट्रंकवाला शून्यावर त्रिफळा बाद झाला. त्यानंतर ओमकार खाटपेने २७चेंडूत ३चौकार व १ षटकारासह ३१धावा, तर सौरभ नवलेने १६चेंडूत २चौकार व १षटकारांसह २१ धावा केल्या. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी २६चेंडूत ३५ धावांची भागीदारी केली. त्यानंतर राजवर्धन हंगर्गेकर(२३धावा), सौरभ सिंग(१८धावा), ओम भोसले(१६धावा), शामसुझमा काझी(१६धावा), ओम भोसले(१६धावा), दिग्विजय जाधव(१३धावा) यांनी छोटी पण महत्वपूर्ण खेळी करत छत्रपती संभाजी किंग्स संघाला २०षटकात ९बाद १६५धावांचे आव्हान उभे करून दिले. ईगल नाशिक टायटन्सचा लेगस्पिनर प्रशांत सोळंकीने ३३धावात ३गडी बाद केले. तर, अर्शिन कुलकर्णी(२-२९), दिग्विजय देशमुख(२-४९) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
या आव्हानाचा पाठलाग करताना ईगल नाशिक टायटन्स संघाला १९.५ षटकात सर्वबाद ११८धावांवर संपुष्टात आला. मंदार भंडारी(९), अर्शिन कुलकर्णी(१०), हरी सावंत(४), अथर्व काळे(६) हे वरच्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे नाशिक टायटन्स संघ ४बाद ४७धावा असा अडचणीत सापडला. त्यानंतर रणजीत निकमने एकाबाजूने लढताना ४३चेंडूत २चौकार व ४षटकाराच्या मदतीने नाबाद ५२ धावांची खेळी केली. छत्रपती संभाजी किंग्सकडून राजवर्धन हंगर्गेकर(३-१८), आनंद ठेंगे(३-३६), प्रणय सिंग(१-१४), शामसुजमा काझी(१-३४) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक:
छत्रपती संभाजी किंग्स: २०षटकात ९बाद १६५धावा(ओमकार खाटपे ३१(२७,३x४,१x६), राजवर्धन हंगर्गेकर २३, सौरभ नवले २१, सौरभ सिंग १८, ओम भोसले १६, शामसुझमा काझी १६, ओम भोसले १६, दिग्विजय जाधव १३, प्रशांत सोळंकी ३-३३, अर्शिन कुलकर्णी २-२९, दिग्विजय देशमुख २-४९) वि.वि.ईगल नाशिक टायटन्स: १९.५षटकात सर्वबाद ११८धावा(रणजीत निकम नाबाद ५२(४३,२x४,४x६), रोहीत हडके १३, धनराज शिंदे ११, अर्शिन कुलकर्णी १०, राजवर्धन हंगर्गेकर ३-१८, आनंद ठेंगे ३-३६, प्रणय सिंग १-१४, शामसुजमा काझी १-३४); सामनावीर – राजवर्धन हंगर्गेकर.