महाराष्ट्रातील पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने महाराष्ट्र प्रिमियर लीग आणि वुमेन्स महाराष्ट्र प्रिमियर लीगसारखी स्पर्धा आणली आणि महाराष्ट्रातील टॅलेंट जगासमोर आले. पहिल्या दोन वर्षी एमपीएलमधून अनेक युवा आणि गुणवंत पुरुष क्रिकेटपटू मिळाले. त्यानंतर एमसीएने WMPL चा विडा उचलत ही संकल्पना प्रत्यक्षातही आणली. अशी लीग सुरू करणारी एमसीए देशातील पहिली आणि एकमेव असोसिएशन आहे. याच स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र क्रिकेटला एक नवी तार मिळाली. तिच नाव चिन्मयी बोरफळे.
डब्लूएमपीएलच्या दुसऱ्या दिवशी पुणे वॉरियर्स आणि रायगड रॉयल्स आमने-सामने होते. मजबूत रायगड प्रथम फलंदाजी करत असताना, पुणे वॉरियर्ससाठी पहिले षटक टाकण्याची जबाबदारी घेतली चिन्मयी बोरफळेने. बारीक चणीच्या, 24 वर्षाच्या चिन्मयीसमोर होती आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी आणि WPL मध्ये भल्या-भल्या आंतरराष्ट्रीय गोलंदाजांना फोडून काढणारी किरण नवगिरे. मात्र, किरणसमोर चिन्मयीने अजिबात दबाव घेतला नाही आणि किरणला पहिल्याच चेंडूवर झेलबाद केले. त्यानंतर तिने अधिकच तिखट गोलंदाजी केली. तिने लवकरच आपला स्पेल संपवताना चार षटकात फक्त 19 धावा देत चौघींना तंबूचा रस्ता दाखवला. तिच्या स्विंग गोलंदाजीचे उत्तर रायगडच्या बॅटर्सकडे नव्हते. परिणामी रायगड रॉयल्स संघ 102 धावांपर्यंतच पोहोचू शकला आणि या धावांचा यशस्वी पाठलाग करत पुणे संघाने विजय मिळवला. सामन्याची मानकरी अर्थातच चिन्मयी होती.
चिन्मयीचा हा प्रवास सोपा नव्हता. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या छोट्याशा शहरात चिन्मयीने क्रिकेटचे बाळकडू घेतले. सुरुवातीपासूनच क्रिकेट खेळण्याचे अतिशय ध्येय होते. चिन्मयी मोठी होत असताना तिच्यासोबत खेळायला मुली नसत. त्यामुळे तिने मुलांसोबत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यातही तिची कामगिरी उठून दिसायची. ग्रामीण भागात क्रिकेटची फारशी सुविधा नसतानाही तिने आपल्या इच्छाशक्तीच्या व मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र संघापर्यंतचा प्रवास केला. गंगाखेडच्या रायझिंग क्रिकेट क्लबमध्ये खेळत असताना वेदांत महाजन, विजय बहोत, विकी बागडे व चंद्रकांत सातपुते या प्रशिक्षकांनी तिच्या क्रिकेट कौशल्यांना अधिक धार लावली.
वयाच्या 15 व्या वर्षी ते परभणीच्या 19 वर्षाखालील मुलींच्या संघात खेळत होती. तिचे कामगिरी दिवसेंदिवस दमदार होत असताना 2020-2021 मध्ये तिला महाराष्ट्र अंडर 19 संघात खेळायची संधी मिळाली. एमपीएल 2023 दरम्यान खेळलेल्या महिलांच्या प्रदर्शनीय सामन्यात तिने स्मृती मंधानाला बाद करण्याची किमया केलेली. वेगवान गोलंदाज म्हणून ती नाव कमावत असली तरी तिच्यात, अष्टपैलू होण्याची देखील तितकीच क्षमता आहे. कारण, अनेक क्लबस्तरीय सामन्यांमध्ये ती सलामीवीर म्हणून खेळते.
स्विंग हे अस्त्र असलेल्या चिन्मयीच्या कामगिरीकडे संपूर्ण हंगामात सर्वांचे लक्ष असेल. आधी WMPL, महाराष्ट्र महिला संघ, WPL असा प्रवास करून ती भारतीय संघासाठी खेळते का? यासाठी महाराष्ट्रातील सर्व क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत.






