टी२० विश्वचषक स्पर्धेत सुपर १२ चा थरार सुरू झाला आहे. दक्षिण आफ्रिका संघानेही वेस्ट इंडिजला पराभूत करून स्पर्धेत पुनरागमन केले आहे. यातच दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसने मोठे विधान केले आहे. मॉरिसने सांगितले की, तो यापुढे दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार नाही. दक्षिण आफ्रिका संघात पुनरागमनाचे दरवाजे बंद झाल्याचे त्याने म्हटले आहे. मात्र, तो निवृत्तीची घोषणा करणार नसल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे.
बोर्डाला माझा निर्णय माहित
मॉरिसने सांगितले की, “मी कदाचित दक्षिण आफ्रिकेच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार नाही. दक्षिण आफ्रिका संघातील माझी कारकीर्द आता संपली आहे. मात्र, निवृत्तीची अधिकृत घोषणा करण्यावर माझा विश्वास नाही. माझा निर्णय काय आहे हे बोर्डाला माहीत आहे आणि मलाही माझ्या निर्णयाची जाणीव आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेलाही माहीत आहे की, मी यापुढे संघासाठी खेळणार नाही. आता मी देशांतर्गत क्रिकेटवर लक्ष केंद्रित करेल. मला दक्षिण आफ्रिकेकडून तिन्ही प्रकारामध्ये खेळण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. मला माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला. जर तुम्ही मला काही महिन्यांपूर्वी हाच प्रश्न विचारला असता तर मी त्याचे लांबलचक उत्तर दिले असते पण सध्या मी माझ्या आयुष्यात आणि कारकिर्दीबाबत आनंदी आहे.”
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू राहिला मॉरिस
ख्रिस मॉरिस हा दक्षिण आफ्रिकेचा महान अष्टपैलू खेळाडू राहिला आहे. संघासाठी त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये भाग घेतला. मॉरिसने दक्षिण आफ्रिका संघासाठी चार कसोटी, ४२ वनडे आणि २३ टी२० सामने खेळले. मॉरिसने संघातील वरिष्ठ खेळाडू फाफ डू प्लेसिस आणि इम्रान ताहिर यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. मॉरिस आता जगभरातील टी२० लीगमध्ये खेळतो. अलीकडेच तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसला होता. टी२० विश्वचषकासाठी त्याची संघात निवड झाली नाही.