एकिकडे इंडियन प्रीमीयर लीगची धामधूम सुरू असताना दुसरीकडे क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्यांच्या वरिष्ठ पुरुष संघासाठी नव्या प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. त्यांनी इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू ख्रिस सिल्व्हरवूड यांना मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केले आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (Sri Lanka Cricket Board) दिलेल्या माहितीनुसार सिल्व्हरवूड (Chris Silverwood) यांची नियुक्ती २ वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे आता श्रीलंका संघ पुढील दोन वर्षे त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना दिसेल. सिल्व्हरवूड श्रीलंकेच्या आगामी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून आपल्या कामाला सुरुवात करतील.
श्रीलंकेच्या प्रशिक्षकपदी (Head Coach of Sri Lanka) नियुक्ती झाल्याबद्दल सिल्व्हवूड म्हणाले, ‘मी श्रीलंकेच्या संघाशी जोडण्यासाठी उत्सुक आहे. तसेच आता मी कोलंबोला जाऊन माझे काम सुरू होण्याची प्रतिक्षा करत आहे. त्यांच्याकडे प्रतिभाशाली आणि खेळण्याची जिद्द असलेल्या खेळाडूंचा चांगला संघ आहे. मी खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला भेटण्यासाठी उत्सुक आहे.’
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सीइओ ऍश्ले डी सिल्वा यांनीही सिल्व्हरवूड यांच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला असून त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्यामुळे संघाला फायदा होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.
सिल्व्हरवूड यांनी प्रशिक्षण क्षेत्रात उतरण्यापूर्वी इंग्लंडकडून खेळाडू म्हणून सहा कसोटी आणि सात वनडे सामने खेळले आहेत. तसेच ते यॉर्कशायर आणि मिडलसेक्स या काऊंटी संघाकडूनही क्रिकेट खेळले आहेत. खेळाडू म्हणून कारकिर्द घडवल्यानंतर ते प्रशिक्षण क्षेत्रात उतरले. इंग्लंडने २०१९ ला वनडे विश्वचषक जिंकला त्यावेळी ते संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते. त्यांनी इंग्लंडचे तात्कालिन मुख्य प्रशिक्षक ट्रेवर बायलिस यांच्यासह चांगली कामगिरी केली होती.
तसेच बायलिस यांच्यानंतर ऑक्टोबर २०१९ ला सिल्व्हरवूड यांच्याकडेच इंग्लंडचे मुख्यप्रशिक्षकपद आले. त्यांनी इंग्लंड संघाबरोबर मुख्य प्रशिक्षक म्हणून जवळपास ३ वर्शे काम केले. मात्र, यावर्षाच्या सुरुवातीला इंग्लंड संघ ऍशेस मालिका ४-० अशा फरकाने पराभूत झाल्यानंतर ते या पदावरून पायउतार झाले. आता त्यांनी श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षकपद स्विकारले आहे.
सिल्व्हरवूड यांना प्रशिक्षणाचा बराच अनुभव देखील आहे. त्यांनी सर्वात पहिल्यांदा झिम्बाब्वेमध्ये मशोनलँड इगल्स संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. तसेच ते एसेक्स कौऊंटी संघाचेही यशस्वी प्रशिक्षक राहिले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एसेक्स २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर २०१७ साली काऊंटी चॅम्पियनशीप जिंकले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
गुजरातच्या ‘मॅच विनर’ तेवतियाला महान कर्णधाराने दिले नवे नाव; म्हणाले, ‘त्याच्या रक्तातच…’
युएईत आयपीएल गाजवलेल्या ऋतुराजला मानवेना भारतातील हवामान; आकडेवारीच देतेय साक्ष