काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ऍशेस मालिका (Ashes series) पार पडली. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड संघाला ४-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता. या निराशाजनक कामगिरीनंतर इंग्लंड क्रिकेटमध्ये अनेक बदल होऊ लागले आहेत. इंग्लंड संघाचे व्यवस्थापकीय संचालक ऍश्ले जाईल्स (Ashley Giles) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता आणखी एका प्रमुख व्यक्तीने आपले पद सोडले आहे.
ऍशेस मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर इंग्लंड संघावर व संघ व्यवस्थापनावर सातत्याने टीका होत आहे. या टीकेला सामोरे जात इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक व निवडकर्तो ख्रिस सिल्वरवूड ( Chris Silverwood) यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) आपल्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची माहिती दिली.
इंग्लंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन यांनी सिल्वरवूड यांचे आभार व्यक्त करताना म्हटले,
“ख्रिस सिल्व्हरवूड यांनी त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या काळात संघाला यश मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांनी आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे केले. खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्यासोबत काम करताना खूप आनंद झाला. त्यांच्या प्रशिक्षणाखाली इंग्लंडचा मर्यादित षटकांत संघ पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. याशिवाय त्यांनी कसोटी संघालाही भरपूर यश मिळवून दिले. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेतही विजय मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.”
सिल्वरवूड हे आणखी काही काळ आपल्या पदावर राहण्यासाठी इच्छुक होते. मात्र, बोर्डातील अधिकाऱ्यांच्या दबावामुळे त्यांना नमते घ्यावे लागले.
जाईल्स यांनी दिला राजीनामा
मागील तीन वर्षांपासून इंग्लंड संघाचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या ऍश्ले जाईल्स यांनी गुरुवारी (३ फेब्रुवारी) आपले पद सोडले. त्यांच्या जागी इंग्लंडचे माजी कर्णधार ऍण्ड्रू स्ट्रॉस हे अंतरिम व्यवस्थापकीय संचालक ही जबाबदारी पार पाडतील. त्यानंतर योग्य व्यक्तीची या पदासाठी निवड केली जाईल. ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलिया ने इंग्लंड संघाला पुरते नामोहरम करत ४-० अशी मात दिलेली. मालिकेतील चौथी कसोटी कशीबशी अनिर्णीत राखण्यात इंग्लंड संघाला यश आले होते. तेव्हापासूनच इंग्लंड क्रिकेटमध्ये बदलाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या-
विराटने कसोटी कर्णधारपद सोडल्यावर काय होती प्रतिक्रिया? शार्दुल ठाकूरचा खुलासा
“मला एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळायचंय”, युवा भारतीय खेळाडूने व्यक्त केली इच्छा