भारत विरुद्ध इंग्लंड संघात चालू असलेली कसोटी मालिका अंतिम चरणात आली आहे. नुकताच अहमदाबाद येथे दोन्ही संघात तिसरा कसोटी सामना झाला असून भारताने इंग्लंडला १० विकेट्सने पराभूत केले आहे. यासह यजमान संघ मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. पुढील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना ४ मार्चपासून सुरू होणार आहे. तत्त्पुर्वी इंग्लंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्स याने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोमधील वृत्तानुसार, वोक्सला रोटेशन पॉलिसी अंतर्गत पहिल्या ३ कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. यानंतर चौथ्या कसोटीतही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाने कळवताच वोक्सने मायदेशी जाण्याचे मन बनवले. गुरुवारी (२५ फेब्रुवारी) त्याने इंग्लंडला जाण्यासाठी उड्डाण भरली आहे.
भारतीय दौऱ्याबरोबर श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही त्याची इंग्लंड संघात निवड झाली होती. परंतु या तिन्ही देशांविरुद्ध त्याला बाकावर बसून राहावे लागले.
इतर खेळाडूंनाही रोटेशन पॉलिसीचा फटका
वोक्सपुर्वी इंग्लंडचे क्रिकेटपटू जोस बटलर आणि मोईन अली यांनाही रोटेशन पॉलिसीनुसार भारत दौरा अर्ध्यात सोडून मायदेशी पाठवण्यात आले आहे. अष्टपैलू अलीने दुसऱ्या कसोटी सामन्यातून संघात पुनरागमन केले होते. तर यष्टीरक्षक बटलर पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा भाग होता. एवढेच नव्हे तर, विस्फोटक फलंदाज जॉनी बेयरस्टो यालाही दमदार फॉर्ममध्ये असूनही पहिल्या २ कसोटीत विश्रांती देण्यात आली होती.
इंग्लंड संघाकडे शेवटची संधी
अहमदाबाद येथील तिसरा कसोटी सामना गमावल्यानंतर पाहुणा इंग्लंड संघ मालिते १-२ ने पिछाडीवर आला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने द्विशतक शतक झळकावत आपल्या संघाला २२७ धावांनी विजय मिळवून दिला होता. पण त्यांनतर भारतीय संघाने चोख प्रत्युत्तर देत इंग्लंड संघाला ३१७ धावांच्या मोठ्या अंतराने पराभूत केले होते. यात आर अश्विनने अष्टपैलू कामगिरी केली होती.
आता शेवटचा कसोटी सामना अहमदाबादमध्ये ४ मार्च ते ८ मार्च दरम्यान खेळला जाईल. हा सामना जिंकत मालिका बरोबरीवर आणण्यासाठी इंग्लंड संघ झगडताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल २ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ‘युनिव्हर्स बॉस’चे पुनरागमन, विंडीज टी२० संघात मिळाली जागा
आयसीसी आणि बीसीसीआयमध्ये पुन्हा बिनसलं, पाहा काय आहे यामागचं कारण