पुणे। जीओजी एफसीसी आणि स्निग्नय यांच्या दरम्यान सिटी कप २०२१ फुटबॉल स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या माध्यमातून सिटी एफसी पुणे संघाने या स्पर्धेचे आयोजन आपल्यास सिटी स्पोर्टस अरेना येथे केले आहे.
स्पर्धेत शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जीओजी एफसीसी (गेम ऑफ गोल फुटबॉल कोचिंग सेंटर) संघाने कमालीचा आक्रमक खेळ करताना जाएंटस संघाचा ५-२ असा पराभव केला. प्रकाश थोरात याने दहाव्याच मिनिटाला संघाला आघाडी मिळवून दिली. विकी राजपूत आणि कार्तिक राजू यांच्या साथीत चाल रचताना प्रकाशने जाएंटसच्या बचावफळीला चकवा देत गोलरक्षक नौशाद बोधनवाला याला देखिल चेंडू अडवण्याची संधी मिळू दिली नाही. इतकी त्याची किक वेगवान होती. त्यानंतर विकी राजपूतने २२व्या मिनिटाला दुसरा गोल केला.
जाएंटस संघाने त्यानंतर अकरा मिनिटांनी जीओजीच्या बचावतील चुकीचा फायदा घेत मुसंडी मारली होती. त्यावेळी त्यांना धोकादायक पद्धतीने अडवल्यामुळे पंचांनी जाएंटसला पेनल्टी बहाल केली. ही संधी त्यांनी सोडली नाही. जीवन नलगे याने गोल केला. पहिल्या सत्रात खेळ थांबला तेव्हा जीओजीने ३-१ अशी आघाडी घेतली होती. त्यांचा तिसरा गोल श्रीकांत मोलनगिरी याने ३६व्या मिनिटाला केला.
उत्तरार्धात जीओजी संघाने आणखी एक गोल करताना संघाची आघाडी भक्कम केली. जाएंटसच्या बचावातील त्रुटी समोर आणत त्यांनी आपली आक्रमकता अधिक तीव्र केली. सामन्याच्या ५५व्या मिनिटाला त्यांच्या भुवनेश पिल्लेने अगदी सहजपण जाएंटसच्या गोलरक्षकाला चकवले. दोनच मिनिटांनी अन्शुल शर्माने गोल करताना जाएंटसचा दुसरा गोल केला. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात ईश्वर क्षीरसागर याने ६२व्या मिनिटाला गोल करून जीओजीच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्यापूर्वी, झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत गोलशून्य बरोबरीनंतर स्निग्मय एफसी संघाने टायब्रेकरमध्ये केपी इलेव्हनचे आव्हान संपुष्टात आणले. शूट आऊटमध्ये स्निग्मयसाठी संग्राम पाटील प्रतिक साबळे, हेमराज हुजा, शंकर कदम, वाल्मिकी यांनी जाळीचा अचूक वेध घेतला. केपीसाठी विकी परदेशी,संदेश मोरे, प्रबुद्ध गायकवाड यांना यश आले.
स्पर्धेची अंतिम लढत स्निग्मय एफसी आणि जीओजी एफसीसी यांच्या दरम्यान उद्या दुपारी ३ वाजता खेळविण्यात येईल.
निकाल –
स्निग्मय एफसी ० (५) (संग्राम पाटील, प्रतिक साबळे, हेमराज हुडा, शंकर कदम, विक्रांत वाल्मिकी) वि.वि. केपी इलेव्हन ०(३) (विकी परदेशी, संदेश मोरे, प्रबुद्ध गायकवाड)
जीओजी एफसीसी ५ (प्रकाश थोरात १०वे, विकी राजपूत २२वे, श्रीकांत मेलनगिरी ३६वे, भुवनेशन पिल्ले ५५वे आणि ईश्वर क्षिरसागर ६२वे मिनिट) वि.वि. जाएंटस २ (जीवन नलगे ३३ने, अंन्शुल शर्मा ५७वे)