पुणे। केपी इलेव्हन आणि स्निग्मय एफसी संघांनी सहज विजय मिळवून सिटी कप २०२१ फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या मार्गदर्शनाखाली सिटी एफसी पुणे संघाने आपल्या मोशी येथील मैदानावर या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
पहिल्या उपांत्य पूर्व लढतीत केपी इलेव्हन संघाने पिछाडीवरून ब्ल्यू स्टॅग संघावर ४-१ असा विजय मिळविला. दुसऱ्या उपांत्यपूर्व लढतीत स्निग्मय एफसी संघाने आयफा संघाचा एकतर्फी लढतीत ४-० असा पराभव केला.
केपी इलेव्हन आणि ब्ल्यू स्टॅंग संघातील सामना मध्यंतराला गोलशून्य बरोबरीत होता. दोन्ही संघांकडून गोल करण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. उत्तरार्ध मात्र वेगवान झाला. कैलाश परदेशी याने ३५व्या मिनिटाला आपल्याच संघावर गोल करून ब्ल्यू स्टॅगला आघाडीवर नेले. विशेष म्हणजे केपी इलेव्हन संघालाही स्वयं गोलमुळेच बरोबरी साधता आली. सामन्याच्या ४६व्या मिनिटाला अनिकेत गेन याने बचावाच्या नादात चेंडू आपल्याच जाळ्यात मारला. या स्वयंगोलने केपी इलेव्हनला बरोबरी साधता आली.
त्यानंतर अखेरच्या पाच टप्प्यात कमालीचा वेगवान खेळ करत त्यांनी सामना ब्ल्यू स्टॅगच्या हातून काढून नेला. याच अल्फ्रेड नेगल याने ५७व्या, पुढे ५९ आणि ६२व्या मिनिटाला निर्मल छेत्रीने गोल करून केपी इलेव्हनचा विजय साकार केला.
दुसऱ्या सामन्यात स्निग्मय एफसी संघाने आयफाचे आव्हान अगदीच किरकोळीत संपुष्टात आणले. हेमराज हुडा याने १२व्या मिनिटाा स्निग्मय संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर संग्राम पाटिल याने ४५ आणि ५५व्या मिनिटाला दोन गोल केले. सामन्याच्या ६२व्या मिनिटाला प्रतिक साबळे याने गोल करून स्निग्मयचा एकतर्फी विजय साकार केला.
निकाल –
केपी इलेव्हन ४ (अनिकेत गेन (स्वयं गोल ४६वे), अल्फ्रेड नागर ५७वे, निर्मल छेत्री ५९ आणि ६०+२वे मिनिट) वि.वि. ब्ल्यू स्टॅग (कैलाश परदेशी स्वयंगोल ३५वे मिनिट)
स्निग्मय एफसी ४ (हेमराज हुडा १२वे, संग्राम पाटिल ४५वे,५५वे, प्रतिक साबळे ६२वे मिनिट) वि.वि. आयफा ०






