रविवारी (२६ जून) रणजी ट्रॉफी २०२१-२२च्या हंगामाचा विजेता संघ मिळाला. बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला हा सामना मध्य प्रदेशने जिंकला. रणजीच्या सर्वात यशस्वी संघ, मुंबईला ६ विकेट्सने धूळ चारत मध्य प्रदेशने इतिहास रचला आहे. मध्य प्रदेशला रणजी ट्रॉफीचे पहिलेवहिले विजेतेपद मिळवून देण्यात संघातील खेळाडूंबरोबरच अजून एका व्यक्तीचा मोठा वाटा राहिला. तो व्यक्ती म्हणजे, मध्य प्रदेश संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित.
कर्णधार म्हणून मध्य प्रदेशला विजेतेपद मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या चंद्रकांत यांनी प्रशिक्षक म्हणून रणजी ट्रॉफी उंचावण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, चंद्रकांत यांचा प्रशिक्षक म्हणून हा पहिलावहिला नसून तर चक्क सहावा विजय आहे. याचमुळे त्यांना देशांतर्गत क्रिकेटमधील द्रोणाचार्य म्हणून ओळखले जाते.
मध्य प्रदेश संघापूर्वी चंद्रकांत यांनी मुंबई आणि विदर्भ या संघांना विजेतेपद मिळवून दिले आहे. ६० वर्षीय चंद्रकांत यांनी प्रशिक्षक म्हणून पहिली रणजी ट्रॉफी २००२-०३ हंगामात जिंकली होती. या हंगामात त्यांच्या प्रशिक्षणाखाली मुंबई संघाने अंतिम सामन्यात तमिळनाडूला पराभूत करत जेतेपद जिंकले होते. यावेळी पारस महांब्रे मुंबई संघाचे कर्णधार होते. पुढे आपली हीच लय कायम राखत त्यांनी २००३-०४ हंगामातही मुंबईला विजेता बनवले होते. त्यानंतर पुन्हा २०१५-१६ हंगामात आपल्या प्रशिक्षणाची चमक दाखवत त्यांनी मुंबईला रणजी विजेता बनवले होते.
मुंबईनंतर ते विदर्भ संघासोबत जोडले गेले आणि इथेही त्यांचा मिडास टच पाहायला मिळाला. त्यांच्या प्रशिक्षणाखाली २०१७-१८ हंगामात विदर्भ संघ पहिल्यांदाच रणजीचा विजेता बनला. दिल्लीला हरवत विदर्भने या हंगामात विजेता होण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षीही (२०१८-१९) विदर्भाने रणजी ट्रॉफीवर नाव कोरले होते.
Chandu bhai, tumhaala maanla ????????
1st Mumbai, then Vidarbha, and now MP, it's incredible! Best coach when it comes to winning trophies ???? Many congratulations to skipper Aditya Shrivastava, MP team, and support staff ???????????????? #RanjiTrophyFinal pic.twitter.com/BqR1gGXtDW— Wasim Jaffer (@WasimJaffer14) June 26, 2022
२३ वर्षांपूर्वीचे स्वप्न केले पूर्ण
मध्य प्रदेश संघ पहिल्यांदा १९९८-९९ मध्ये रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता, जेव्हा चंद्रकांत पंडित संघाचे कर्णधार होते. चंद्रकांत पंडित (Chandrakant Pandit) मध्य प्रदेश संघाच्या कर्णधारपदी असताना रणजी ट्रॉफी मिळवून देऊ शकले नव्हते. १९९८-९९ रणजी हंगामात मध्य प्रदेश आणि कर्नाटक संघ आमने सामने होते. कर्नाटकने हा सामना ९६ धावांच्या अंतराने जिंकला होता. परंतु आता २३ वर्षांनंतर त्यांनी प्रशिक्षकाच्या रूपात मध्य प्रदेशला विजेता बनवण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बुमराह असेल भारताचा नवा कर्णधार, कपिल देवने रचलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी
फुटबॉल अन् बरंच काही, आयर्लंडशी दोन हात करण्यापूर्वी टीम इंडियाची मस्ती
गडी लय तापलाय! पंचांच्या चुकीच्या निर्णयाविरोधात पृथ्वी शॉने घातला राडा, पाहा व्हिडिओ






