मुंबई । उंचा-पुरा, शांत स्वभावाचा, मोजकेच बोलणारा, ‘म्हैसूर एक्सप्रेस’ म्हणून प्रसिद्ध असणारा कर्नाटकचा वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने 13 वर्ष भारतीय क्रिकेटची सेवा केली. कपिल देव यांच्या निवृत्तीनंतर त्याने भारतीय गोलंदाजीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर यशस्वीपणे सांभाळली.
जवागल श्रीनाथ असा गोलंदाज होता जो एकाच षटकातील सहा चेंडू वेगवेगळ्या प्रकारे टाकायचा. हीच त्यांची खासियत आणि ताकद होती. 1999 साली झालेल्या विश्वचषकातील एका सामन्यात 154. 5 किमी वेगाने चेंडू फेकला होता. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंतचा हा सर्वात वेगाने फेकलेला हा चेंडू होता. श्रीनाथचा हा विक्रम अद्याप कोणत्याही भारतीय गोलंदाजाला तोडता आला नाही.
2002 साली श्रीनाथने निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र सौरव गांगुलीच्या आग्रहानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा आला. 2003 साली झालेल्या विश्वचषकानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. श्रीनाथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लवकरच निवृत्त का झाला? याचा नुकताच खुलासा केला आहे.
श्रीनाथ म्हणाला, “गुडघ्याच्या दुखापतीमुळे मी क्रिकेटमधून लवकरच निवृत्त झालो. माझ्या कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर आशिष नेहरा आणि झहीर खान सारखे प्रतिभावंत वेगवान गोलंदाज भारतीय संघात आले. मी अजून पुढे क्रिकेट खेळत राहिलो असतो तर या दोघांपैकी एकाला संधी मिळाली असती. त्यांना जास्तीत जास्त संधी मिळावी, हा माझा निवृत्ती घेण्या पाठीमागचा उद्देश होता.”
“भारतीय निर्जीव खेळपट्ट्यांवर मला गोलंदाजी करताना खूप त्रास व्हायचा. मी आणखी एक दोन वर्ष क्रिकेट सहज खेळू शकलो असतो, पण माझा गुडघा मला साथ देत नव्हता.
जवागल श्रीनाथने आपल्या कारकिर्दीत 1992, 1996, 1999 आणि 2003 अशा एकूण चार विश्वचषक स्पर्धेत खेळून 44 बळी टिपले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीनशेपेक्षा जास्त बळी घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज आहे. श्रीनाथने आपल्या कारकिर्दीत 67 कसोटी सामन्यात 236 बळी तर 229 वनडे सामन्यात 319 बळी घेतले.