बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रथमच खेळल्या जात असलेल्या महिला क्रिकेटचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जातोय. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपला मजबूत संघ उतरवला. त्याचवेळी या अंतिम सामन्यात एक धक्कादायक घटना देखील घडली. ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू ताहिला मॅकग्रा चक्क कोविड पॉझिटिव्ह असताना या सामन्यात सामील झाली.
Tahlia McGrath keeps her distance from teammates after testing positive to COVID-19 pre-match.
She remains in Australia's XI, with a number of precautions in place #AUSvIND #B2022 pic.twitter.com/Sb8ih7AgTG
— cricket.com.au (@cricketcomau) August 7, 2022
न्यूझीलंडला पराभूत करत ऑस्ट्रेलियन संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपला तोच संघ कायम ठेवला. कोविडचे संकट अद्याप पूर्णपणे टळले नाही. सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाच्या खेळाडूंची कोविड चाचणी घेण्यात आली. ज्यामध्ये ताहिलाला कोविडची काही सौम्य लक्षणे दिसून आली.
अशा परिस्थितीतही तिला या अति महत्त्वाच्या अंतिम सामन्यात खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ती इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंसह ड्रेसिंग रूम शेअर करताना दिसली नाही. ऑस्ट्रेलियाचे दोन बॅटर बाद झाल्यानंतर ती फलंदाजीला देखील आली. मात्र, ४ चेंडूवर अवघ्या २ धावा केल्या असताना, तीला दिप्ती शर्माने बाद केले. मात्र, तिला अशा पद्धतीने खेळण्यासाठी परवानगी देणे धोकादायक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. त्यामुळे इतर खेळाडूंच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो असे बोलले गेले.
ऑस्ट्रेलियाची सन्मानजनक धावसंख्या
या सामन्यात प्रथम फलंदाजी संधी मिळालेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात तितकी चांगली झाली नाही. एलिसा हिली लवकर बाद झाल्यानंतर बेथ मुनी व मेग लेनिंग या जोडीने ७४ धावांची भागीदारी रचली. या भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकात १६१ धावा केल्या. मुनीने सर्वाधिक ६१ धावा केल्या. भारतासाठी स्नेह राणा आणि रेणुका सिंहने प्रत्येकी दोन बळी मिळवले.