सेंट किट्स ऍंड नेविस पॅट्रियट्स संघाने कॅरेबियन प्रीमियन लीगमध्ये (सीपीएल) उत्तम कामगिरी करत स्पर्धेला सुरुवात केली आहे. संघ आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. असे असले तरीही, या संघाला एक झटका बसला आहे. त्यांच्या एका खेळाडूला स्पर्धेतून बाहेर केले गेले आहे. त्याने बायो-बबलचे उल्लंघन केले होते. या २१ वर्षीय खेळाडूचे नाव मिकाइल लुइस असे आहे.
सीपीएल २०२१ च्या कोरोना प्रोटोकाॅलप्रमाणे, स्पर्धा पूर्णपणे संपेपर्यंत प्रत्येक खेळाडू बायो-बबलचे पालन करेल. बबलच्या बाहेरचा कोणीही व्यक्ती आत येऊ शकत नाही आणि बबलच्या आतमध्ये असणारा कोणताच खेळाडू बबलच्या बाहेर जाऊ शकत नाही. कोरोना प्रोटोकाॅलमध्ये असेही लिहिले आहे की, नियम तोडणाऱ्या कोणालाही स्पर्धेतून बाहेर केले जाईल.
स्पर्धेचे ऑपरेशंस डायरेक्टर माइकल हाॅलने मिकाइल लुइससंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “एका जवळच्या मित्राविषयी दु:खद बातमी मिळाल्यावर लुईस अनुमती नसतानाही संघाच्या हाॅटेलच्या बायो-बबलमधून बाहेर पडला होता. त्याचा हा निर्णय अयोग्य आणि दुर्भाग्यपूर्ण होता. असे असले तरीही, लीगची त्याच्यासोबत सहानुभूती आहे. कारण त्याला त्याचा मित्र संकटात असल्यामुळे बाहेर पडावे लागले. तरी देखील, कोणालाही लीगसाठी तयार केलेले बायो-बबल तोडण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.”
लुईस वेस्टइंडीजच्या १९ वर्षांखालील संघासाठी खेळला आहे. त्याची सीपीएलमध्ये निवड झाली असूनही त्याला पदार्पण करता आलेले नाही. सीपीएलचा हंगाम २६ ऑगस्टपासून सुरू झाला आहे. स्पर्धेचे सर्व सामने सेंट किट्स ऍंड नेविस स्टेडियममध्येच खेळले जात आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना १५ सप्टेंबरला होणार आहे.
यावर्षी स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये ५०% प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. मागच्यावर्षीच्या हंगामात कोरोनामुळे स्टेडियमवर प्रेक्षकांना परवानगी दिली गेली नव्हती. सध्या सेंट किट्स ऍंड नेविस पॅट्रियट्स संघ ३ सामन्यांत ६ गुणांसह स्पर्धेच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
निवृत्तीनंतर स्टुअर्ट बिन्नी प्रशिक्षक बनण्यास इच्छुक, ‘या’ भागातील खेळाडूंना देणार धडे
नादच खुळा! दोन नव्या संघांच्या लिलावातून बीसीसीआयला मिळणार ‘एवढे’ रुपये
बटलर-स्टोक्सच्या जागी राजस्थान रॉयल्समध्ये २ नव्या खेळाडूंची एन्ट्री; एकाने ठोकलेत ३३७ षटकार