कोलकता|आयपीएल 2018 च्या १३व्या सामन्यात आज किंग्ज इलेव्हन पंजाबने कोलकता नाईट रायडर्सला डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे ९ विकेट्सने पराभूत केले. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून ख्रिस गेल आणि केएल राहूलने चांगली फटकेबाजी करत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.
या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामूळे प्रथम फलंदाजीला आलेल्या कोलकता नाईट रायडर्सने २० षटकांत ७ बाद १९७ धावा केल्या. त्यात ख्रिस लीनच्या ७४ धावांचा समावेश आहे. परंतू पावसामुळे डकवर्थ लुईस नियमाचा आधार घेत सामना १३ षटकांचा करण्यात आला.
तसेच पंजाबसमोर १३ षटकांत १२५ धावांचे लक्ष ठेवण्यात आले.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ख्रिस गेल आणि केएल राहूलने पंजाबला जबरदस्त सुरूवात करून दिली. गेलने ३८ चेंडूत नाबाद ६२ तर राहूलने २७ चेंडूत ६० धावा केल्या. संघाला जिंकण्यासाठी ९ धावांची गरज असताना राहूलला सुनील नारायणने बाद केले.
या विजयाबरोबर पंजाब गुणतालिकेत अव्वल स्थानी आला असून ख्रिस गेलकडेही आॅरेंज कॅप आली आहे.