भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक समजले जाते. त्याने आपल्या फलंदाजी, नेतृत्व आणि यष्टीरक्षणाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने आपल्या नेतृत्वात भारतीय संघाला आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. त्याचबरोबर आयपीएल फ्रंचायझी संघ चेन्नई सुपर किंग्ज संघाला ३ वेळा विजेतेपद जिंकून दिले आहे.
२००७ सालचा टी२० विश्वचषक, २०११ सालचा वनडे विश्वचषक आणि २०१३ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने धोनीच्या नेतृत्वात जिंकली. याव्यतिरिक्त धोनीने केवळ कर्णधार म्हणूनच नव्हे, तर फलंदाज म्हणूनही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १७००० पेक्षाही अधिक धावा केल्या आहेत. तसेच, १६ शतकेही ठोकली आहेत.
तसं पाहिलं, तर धोनीने (MS Dhoni) भारताला २०११ विश्वचषकासमवेत अनेक सामने आपल्या फलंदाजीच्या जोरावर जिंकून दिले आहेत. तरीही धोनीने खेळलेल्या अनेक खेळी अशा आहेत, ज्यामध्ये त्याने चांगली खेळी तर केलीच. परंतु भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
या लेखात आपण धोनीच्या वनडेतील अशाच ३ खेळींबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये त्याने चांगली कामगिरी करूनही भारताला विजय मिळवता आला नाही.
धोनीने खेळलेल्या ३ उत्कृष्ट खेळी, पण ज्यामध्ये भारताला करावा लागला पराभवाचा सामना- 3 Innings by MS Dhoni in which India did not Win the Match
३. ९५ धावा, विरुद्ध- वेस्ट इंडिज, जून २००९
भारतीय संघाने २००९ मध्ये वेस्ट इंडिजचा दौरा केला होता. त्यातील ४ सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना किंग्सटन येथे खेळण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात फार काही चांगली झाली नाही. भारतीय संघाचा डाव सुरुवातीला ३ बाद केवळ ७ धावांवर होता. परंतु धोनी फलंदाजीला आल्यानंतर त्याने एका बाजूने भारताचा डाव सांभाळला. त्याने आरपी सिंगबरोबर (RP Singh) १०१ धावांची भागीदारी करत भारताची धावसंख्या १८० च्या पार नेली. धोनीने या दरम्यान १३० चेंडूंचा सामना करताना २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ९५ धावा केल्या. शेवटी दहाव्या विकेट्सच्या रुपात तो बाद झाला.
धोनीच्या या उत्कृष्ट खेळीमुळे भारतीय संघाने १८८ धावांपर्यंत मजल मारली होती. तरीही वेस्ट इंडिज संघाने केवळ २ विकेट्स गमावत ३५ व्या षटकामध्येच हे आव्हान १९२ धावा करत पूर्ण केले. त्या सामन्यात विडींजच्या रवी रामपालला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले होते.
२. ११३ धावा, विरुद्ध- पाकिस्तान, डिसेंबर २०१२
पाकिस्तान संघाने २०१२- १३ दरम्यान भारताचा दौरा केला होता. त्यामध्ये ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना चेन्नई येथे भारत विरुद्ध पाकिस्तान संघात खेळण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव ५ बाद २९ धावांवर होता. त्यावेळी धोनी ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. धोनीने आधी सुरेश रैनाबरोबर (४३) ७३ धावांची भागीदारी करत धावसंख्या १०० च्या पार पोहोचविली. त्यानंतर आर अश्विनसोबत नाबाद १२५ धावांची भागीदारी करत भारतीय संघाचा डाव ६ बाद २२७ धावांपर्यंत पोहोचविला.
धोनीने १२५ चेंडूंचा सामना करत ३ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने नाबाद ११३ धावांची शतकी खेळी केली होती. धोनीने कठीण परिस्थितीतून भारतीय संघाचा डाव सांभाळला होता. तरीही या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाकडून नासिर जमशेदने शतकी खेळी करत ४९ व्या षटकामध्येच हे आव्हान पूर्ण केले. असे असले तरी धोनीला त्याच्या शतकी खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले होते.
१. १३९ धावा, विरुद्ध- ऑस्ट्रेलिया, ऑक्टोबर २०१३
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात २०१३ मध्ये मोहाली येथे ७ सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना खेळण्यात आला होता. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाचा डाव सुरुवातीला ४ बाद ७६ धावा होता. त्यानंतर धोनी फलंदाजीला आला. धोनीने आधी विराट कोहलीबरोबर (Virat Kohli) ७२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर खालच्या फलंदाजांबरोबर भागीदारी करत त्याने संघाची धावसंख्या ९ बाद ३०३ धावांपर्यंत पोहोचविली.
धोनीने नाबाद १२१ चेंडूत ५ षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने नाबाद १३९ धावांची खेळी केली. तरीही त्याच्या या खेळीचा भारतीय संघाला काहीच फायदा झाला नाही. शेवटी ऑस्ट्रेलियाने भारताने दिलेले आव्हान ६ विकेट्स गमावत पूर्ण केले. त्या सामन्यात जेम्स फॉकनरला (James Faulkner) सामनावीर म्हणून निवडण्यात आले होते.
वाचनीय लेख-
-सुरुवातीच्या १५ वनडे सामन्यात मैदान गाजवत सर्वाधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज
-आपल्या सेंड ऑफ सामन्यात अवघ्या जगाला रडवणारे ५ दिग्गज क्रिकेटपटू; दोन नावे आहेत भारतीय