मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार एमएस धोनीने अखेर शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत धोनीने याची घोषणा केली.
गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक उपांत्य सामन्यात, न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले नव्हते. जवळपास एक वर्षापासून त्याच्या निवृत्ती विषयीच्या चर्चेने वातावरण चांगलेच तापत राहिले. कदाचित कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे धोनीला निवृत्तीबाबत रणनीती बदलावी लागली असावी.
दरम्यान धोनीच्या निवृत्तीतील 3939 क्रमांकाचा उल्लेख करणे आवश्यक झाले आहे. त्याच्या निवृत्तीनंतर 3939 या क्रमांकाचा आकडा देखील चर्चेत आला आहे. या आकड्यांचा नेमका काय संबंध आहे हे जाणून घेऊयात.
15 ऑगस्ट का निवडले?
धोनीने निवृत्तीसाठी 15 ऑगस्ट ही तारीख का निवडली?असा सर्वात मोठा प्रश्न पडला आहे. जे लोक धोनीला चांगले ओळखतात त्यांना हे माहित आहे की माही सैन्यावर आणि देशावर किती प्रेम करतो. अशा परिस्थितीत निवृत्तीसाठी त्यांने हा ऐतिहासिक स्वातंत्र्याचा दिवस केवळ देशप्रेमामुळेच निवडला असे मानले जात आहे.
3939 हे काय आहे प्रकरण
वास्तविक, 15 ऑगस्ट 2020 चा दिवसही खास आहे. कारण रांचीचा राजकुमार एमएस धोनीने आजच्या दिवशी आपल्या आयुष्यातील 39 वर्षे आणि 39 दिवस पूर्ण केले आहेत. धोनीचा आकडेवारीवरील आत्मविश्वासही जास्त आहे. कारण त्याच्या वाढदिवस म्हणजेच 7 जुलै रोजी असल्याने त्याने आपली जर्सी क्रमांक देखील 7 निवडला होता.






