खेळ म्हटला की अनेक गमती-जमती घडत असतात, त्यांची आठवण वर्षानुवर्षे काढलीही जाते. त्यातही जर एखाद्या आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूचा खास किस्सा असेल तर तो अनेकदा चर्चेत येतो. क्रिकेटमध्येही मैदानाबाहेरचे असे बरेच किस्से आहेत, जे खूप चर्चेत आले. पण नुकतीच मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची एक खास आठवण त्याचा मित्र आणि क्रिकेट निवेदक विक्रम साठे यांनी सांगितली आहे.
ऑस्ट्रेलियाचा निराशाजनक दौरा
भारतीय संघाने २०११-१२ साली ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. या दौऱ्यातील कसोटी मालिकेत भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. कसोटी मालिकेतील पहिला सामना मेलबर्न येथे झाला होता. हा सामना भारताने तब्बल १२२ धावांनी गमावला होता. याच सामन्यात मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पहिल्या डावात १०० वे शतक करण्याचीही संधी चालून आली होती, मात्र तो ७३ धावांवर असताना पिटर सिडलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. दौऱ्याची सुरुवातच निराशाजनक झाल्याने भारतीय संघाचे मनोबल कमी झाले होते.
द्राक्ष्याच्या मळ्यात क्रिकेट सामना
याच मेलबर्न सामन्यानंतरची खास आठवण विक्रम साठे यांनी लिंकेडीनवर शेअर केली आहे. त्यांनी ही खास आठवण सांगताना लिहिले आहे की ‘मेलबर्न कसोटीनंतर भारतीय संघ निराश होता. मी सचिनला मेसेज केला आणि त्याला विचारले की त्याला ब्रेक हवा आहे का आणि मेलबर्नपासून काही तासांच्या अंतरावर असणाऱ्या द्राक्षांच्या मळ्यात सहलीसाठी त्याला यायला आवडेल का. माझ्याबरोबर हर्षा भोगले आणि सुनंदन लेले (क्रिडा पत्रकार) अशा काही मित्रांनी मिळून या सहलीची योजना आखली होती. माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त सचिनने या सहलीसाठी हो म्हटले नाही तर त्याच्या कुटुंबासमवेत त्याने येण्याचा निर्णय घेतला. ही एक अविस्मरणीय सहल होती.’
साठे यांनी पुढे लिहिले, ‘आम्ही सच्चे भारतीय होतो. कारण आम्ही द्राक्ष्याच्या मळ्यात पोहचताच अर्जुनने (सचिनचा मुलगा) क्रिकेट खेळण्याचा हट्ट केला. त्यामुळे बॅट आणि चेंडू काही क्षणातच बाहेर आले आणि ६ भारतीय द्राक्ष्याच्या मळ्यात वाईनची चव घेण्याऐवजी क्रिकेट खेळायला लागले.’
‘तेथील मालक त्याच्या कर्मचाऱ्यांसह आम्हाला खेळताना पाहण्यासाठी बाहेर आला आणि त्यांनी काय पाहिले, तर जगातील सर्वोत्तम फलंदाज रबरच्या चेंडूने ५ वेड्या भारतीयांसह खेळत होता. त्यात अव्वल दर्जाचा समालोचक (हर्षा) शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करत होता.’
साठे यांनी पुढे गमतीशीरपणे लिहिले की ‘दुर्दैवाने, माझ्या शानदार ऑफ-स्पिन चेंडूचा फोटो नाही, ज्यावर मी चूकत नसेल तर हर्षाने क्षेत्ररक्षण करताना चूक केली होती.’
साठे यांनी या मजेदार आठवणीबद्दल लिहिताना एक फोटोही शेअर केला आहे. ज्यात सचिन फलंदाजी करत असताना हर्षा भोगले यांच्याकडून चेंडू निसटताना दिसत आहे.
सचिन आणि साठे हे चांगले मित्र देखील आहेत, त्यामुळे साठे हे नेहमी सचिनबरोबर घालवलेल्या काही आठवणी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघासाठी तयार केलेल्या जाळ्यात इंग्लंड संघही अडकू शकतो, दिग्गजाने दिला इशारा
आयपीएल २०२१ साठी ‘या’ मोठ्या स्पर्धेच्या वेळापत्रकात होणार बदल? बीसीसीआय करत आहेत चर्चा
बुमराह की बोल्ट? कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यापूर्वी दिग्गजाने सांगितला सर्वोत्तम गोलंदाज