सिडनी । ज्यावेळी चेंडू छेडछाडीमुळे सर्वत्र क्रिकेट ऑस्ट्रेलियावर टीका केली जात होती, त्यावेळी केविन रॉबर्ट्स यांनी मुख्य कार्यकारी पद स्वीकारत बोर्डाची धुरा सांभाळली होती. परंतु मंगळवारी (१६ जून) दबावामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मागील काही महिन्यांपासून कोरोना व्हायरसमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्ल एडिंग्ज (Earl Eddings) यांनी म्हटले, की रॉबर्ट्स यांनी राजीनामा दिला. त्यामुळे त्यांच्याऐवजी यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकाचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निक हॉक्ले (Nick Hockley) जबाबदारी सांभाळणार आहेत.
अर्ल यांनी रॉबर्ट्स (Kevin Roberts) यांच्या राजीनाम्याबाबत कर्मचाऱ्यांना कळवले होते. तसेच, ते पुढे म्हणाले होते, रॉबर्ट्सदेखील नेतृत्व बदलण्याची ही योग्य वेळ असल्याने याच्याशी सहमत होते.
खरंतर कोरोना व्हायरसमुळे आर्थिक संकटाचा सामना करणारा क्रिकेट ऑस्ट्रेलिया आपले मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्ट्स यांना पदावरून काढण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त येत होते. रॉबर्ट्स यांचा करार हा २०२१ च्या शेवटीपर्यंत होता. परंतु त्यापूर्वीच त्यांना आपला राजीनामा दिला.
कठीण काळात सांभाळली होती जबाबदारी
रॉबर्ट्स यांनी २० महिन्यांपूर्वी जेम्स सदरलँड (James Sutherland) यांची जागा घेतली होती. त्यांनी अशावेळी पदभार सांभाळले होते, जेव्हा चेंडू छेडछाड विवादामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्ड संकटात होते.
बोर्डाने २०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना जूनच्या शेवटपर्यंत २० टक्के पगारावर ठेवले आहे. भारतीय संघाने जर ऑस्ट्रेलियाचा दौरा केला नाही, तर त्या नुकसान भरपाईसाठी बोर्डाने ५ कोटी डॉलर्सचे कर्ज घेतले आहे.
ऑस्ट्रेलियाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय टी२० विश्वचषकाचे यजमानपद सांभाळायचे आहे. परंतु आयसीसीने आतापर्यंत त्यावर कोणताही निर्णय दिलेला नाही. तसेच, भारतीय संघदेखील यावर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. परंतु दोन्ही देशांवर सध्या कोरोना व्हायरसचे (Corona Virus) संकट आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-२००३ विश्वचषकातील सामन्यापुर्वी मी दवाखान्यात जाऊन गुडघ्यातील पाणी काढून आलो होतो
-कोवि़ड-१९ दरम्यान आयपीएल झाल्यास बनू शकतो खूप मोठा विक्रम!
-‘मी आशा करतो की चीनी सुधारतील’; विरेंद्र सेहवाग भडकला