काही महिन्यापूर्वी न्यूझीलंडमध्ये महिला क्रिकेटचा महाकुंभ भरलेला. जगातील टॉप आठ महिला क्रिकेट संघ एकमेकांना पछाडून विश्वचषक ट्रॉफी उंचावण्यासाठी भिडले होते. अखेर एका लक्षात राहणाऱ्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन महिलांनी इंग्लंडच्या महिलांना पराभूत करत तब्बल सातव्यांदा विश्वचषक उंचावला. सहा महिन्यात ऑस्ट्रेलिया दोनदा क्रिकेटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनला. दहा-बारा वर्षांपूर्वी ज्याप्रकारे ऑस्ट्रेलिया क्रिकेट जगतावर राज्य करत होती. त्याच प्रकारचा ‘ऑस्ट्रेलियन रूल’ आता क्रिकेटवर सुरू होतोय.
साल २०१७ ला इंग्लंडमध्ये असाच महिला वन-डे क्रिकेट विश्वचषक खेळला गेला. ऑस्ट्रेलियन टीम नेहमीप्रमाणे फेवरेट होती. त्यांनी लीग स्टेज गाजवलीही. सेमी फायनलला त्यांचा सामना झाला वुमेन इन ब्लू म्हणजेच आपल्या भारतीय संघाशी. भारताला हरवत आपण फायनल गाठू असे त्यांना वाटले. पण तो दिवस हरमनप्रीत कौरचा होता. महिला क्रिकेटमध्ये कधीही न पाहिली गेलेली वादळी १७१ धावांची इनिंग तिने खेळली. काही समजायच्या आत ऑस्ट्रेलियन संघ त्या तुफानात उडाला होता. इंडिया फायनल खेळत होती. इथेच ऑस्ट्रेलियन महिला संघाला धक्का बसला असावा.
तसं पाहायला गेलं तर महिला क्रिकेटमध्ये दोनच संघांचा खऱ्या अर्थाने बोलबाला आहे. एक ऑस्ट्रेलिया दुसरी इंग्लंड. विश्वचषकाच्या प्रत्येक फायनलला या दोन्हीपैकी एक संघ असतोच. हे जाणून आश्चर्य वाटेल की, १२ महिला विश्वचषकांपैकी ११ विश्वचषक या दोन्ही टीमच्या हातात गेलेत. टी२० विश्वचषकाची तर बातच और… सातपैकी एक दोन नव्हे तर तब्बल पाच टी२० विश्वचषक ऑस्ट्रेलियाने खिशात घातलेत. हे आकडे पाहून तुम्हाला अंदाज येईलच की ऑस्ट्रेलियन महिला कशाप्रकारे वर्ल्ड क्रिकेटला डॉमिनेट करतात.
तर, या ऑस्ट्रेलियन महिला संघाची पुनरागमनाची कहाणी सुरू झाली ती त्यांच्याच देशात खेळल्या गेलेल्या टी२० विश्वचषकापासून. २०२० ला ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक खेळला गेला. पहिल्या सामन्याला भारताने त्यांना हरवत २०१७ विश्वचषकात सेमी फायनलमध्ये दिलेल्या जखमेची खपली काढली. इथून पुढे मात्र ऑस्ट्रेलियन संघ चांगला सुधारला. बाकी टीमला हरवत सेमीफायनलमध्ये पोहोचला. तिथे दक्षिण आफ्रिकेला बाजूला करत. त्यांनी फायनलमध्ये एन्ट्री मारली. समोर होती पुन्हा एकदा भारतीय संघ. दोन मानहानीकारक पराभवांचे दुःख त्यांना या फायनलमध्ये हलके करायचे होते. त्यांनी हे दुःख असे काय हलके केले की, भारतीय संघाला कधीही न विसरता येण्यासारखा पराभव दिला. सलग दुसऱ्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ फायनलमध्ये हरलेला. ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा टी२० विश्वचषक जिंकला. विजयाची नायिका होती, एलिसा हिली.
आता पुढचे मिशन होते, वनडे विश्वचषकाचे. कोरोनामूळे विश्वचषक एक वर्ष उशीरा झाला, पण जणू काही या टीमने विश्वविजयाचा निर्धार केला होता. अगदी पहिल्या सामन्यापासून त्यांनी अक्षरशः टूर्नामेंटवर वर्चस्व गाजवले. लीग स्टेजच्या सारेच्या साऱ्या ७ सामने त्यांनी एकतर्फी जिंकल्या. दक्षिण आफ्रिका विरुद्धची सेमीफायनलही तशीच जिंकली.
फायनलला समोर आलेले परंपरागत प्रतिस्पर्धी इंग्लंड. पहिली बॅटिंग करायला घेतली आणि पुन्हा एकदा हिली फायनलला चमत्कार करायला सज्ज झाली. इंग्लिश बॉलर्सची अक्षरशः पिसे काढत तिने १७० धावांची रेकॉर्डब्रेक इनिंग खेळली. ३५८ धावांचा एव्हरेस्ट चढायचा प्रयत्न एकट्या नतालिया सीवरने केला. मात्र, इतर कोणाची साथ लाभली नाही अन् ऑस्ट्रेलियन महिला ९ वर्षांनी पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन बनल्या.
ऑस्ट्रेलियन महिला संघावर नजर टाकल्यास बऱ्याच मॉडर्न ग्रेट संघात दिसतील. कॅप्टन मेग लेनिंग चौथ्यांदा विश्वचषक विजेती कर्णधार ठरली. हा इंटरनॅशनल क्रिकेटचा रेकॉर्ड आहे. एलिसा हिली आणि बेथ मुनी नेहमीच बॅटिंगचा डोलारा सावरतात. एलिसा पेरी ऑल टाईम ग्रेट ऑलराऊंडर बनली आहे. शूट, मॅकग्रा, गार्डनर करिअरच्या सुवर्ण काळामधून चाललेल्या आहेत. एलेना किंग, रॅचेल हेन्स, डार्सी ब्राऊन ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे भविष्य म्हणून ओळखल्या जाऊ लागल्यात.
पुरुष क्रिकेट इतकच आज महिला क्रिकेटलाही महत्त्व प्राप्त झालेय. ऑस्ट्रेलिया इंग्लंडचे वर्चस्व मोडीत काढत. भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड त्यांना टक्कर देत आहेत. या सर्व स्पर्धेतही ऑस्ट्रेलिया महिला टीम सिद्ध करते की, सध्या तरी इथले सिकंदर आम्हीच आहोत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वाचा –
‘कॅरेबियन फ्लेवर’शिवाय आयपीएलला मजा नाय
मराठी माणसाला अभिमान वाटेल असा आहे वानखेडे स्टेडियम बनण्याचा इतिहास