ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ गेल्या काही महिन्यांपासून अनेक अडचणींचा सामना करतोय. मार्च महिन्यात झालेल्या बॉल टेंम्परींग प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियन संघ पार कोलमडून पडला आहे.
त्यातच जूनमध्ये झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाला ५-० असा सपाटून मार खावा लागला होता.
एकदिवसीय विश्वचषकाला अवघे काही महिने बाकी असताना ऑस्ट्रेलिया गेल्या १८ एकदिवसीय सामन्यात १६ वेळा पराभूत झाला आहे.
मात्र हे सर्व असुनही ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रीकी पॉन्टींगने आपल्या संघाची पाठराखण केली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संकेतस्थळाशी बोलताना त्याने ऑस्ट्रेललियन संघ भविष्यात चांगली कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
“२०१९ च्या विश्वचषकाला आता काही महिने बाकी आहेत. विश्वचषकाला सुरवात होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया १६ एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यामुळे विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने आमच्याकडे मुबलक सामने बाकी आहेत असे मला वाटते.” पॉन्टींग ऑस्ट्रेलियन संघाच्या एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी बाबत बोलताना म्हणाला.
“आमचा देश क्रिकेट प्रेमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इथे चांगले क्रिकेटपटू घडत आले आहेत. इथून पुढेही घडत राहतील. जेव्हा आमचा सर्वोत्तम संघ मैदानावर उतरेल तेव्हा तो जगातील कोणत्याही संघाला कोणत्याही परिस्थितीत हरवू शकतो.” या शब्दात माजी कर्णधार पॉन्टींगने ऑस्ट्रेलियन संघाची पाठराखण केली.
नुकतेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने रिकी पॉन्टींगला ऑस्ट्रेलियाच्या सहाय्यक प्रशिक्षक पदी नेमले आहे. २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत तो या पदावर राहणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स घेणारा क्रिकेटर करणार क्रिकेटला अलविदा
-इशांत शर्माने सांगितला धोनी आणि कोहलीमधील फरक