नुकताच आयपीएल 2023 हंगाम पार पडला. यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. डब्ल्यूटीसी अंतिम सामना खेळण्यासाठी भारतीय खेळाडू लंडनला पोहोचले असून 7 जूनपासून के ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडणार आहेत. डब्ल्यूटीसी अंतिम सामना तटस्थ ठिकाणी खेळला जात आहे. या कसोटी सामन्यात ड्यूक चेंडू वापरला जाणार आहे, तर भारतीय खेळाडूंनी आयपीएलमध्ये एसजी चेंडूने क्रिकेट खेळले होते.
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात वापरला जाणार ड्यूक चेंडू
अशात भारतीय संघ आयपीएल आणि डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यापूर्वी मिळालेल्या वेळेत ड्यूक (Duke Ball) चेंडूने सराव करत आहे. भारतीय खेळाडूंनी आयपीएलदरम्यानही ड्यूक चेंडूनेच सराव केला होता. जेणेकरून आयपीएलनंतर लगेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात (World Test Championship Final) उतरल्यानंतर खेळाडूंना अडचण येणार नाही.
अशात अनेक क्रिकेटप्रेमींच्या मनात हा प्रश्न आला असेल की, एसजी आणि ड्यूक चेंडूमध्ये काय फरक आहे? तसेच, डब्ल्यूटीसी अंतिम (WTC Final) सामन्यात ड्यूक चेंडूचाच वापर केला जाणार आहे? चला तर या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात…
क्रिकेटमध्ये किती प्रकारचे चेंडू असतात?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या 3 प्रकारचे चेंडू वापरले जातात. हे तीन चेंडू म्हणजेच कूकाबुरा (Kookaburra), ड्यूक (Duke) आणि एसजी (SGG) होय. हे तिन्ही चेंडू वेगवेगळ्या देशांमध्ये वापरले जातात.
कोणत्या देशात कोणत्या चेंडूचा वापर?
जागतिक क्रिकेटमध्ये कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये कूकाबुरा चेंडूंचा सर्वाधिक वापर केला जातो. 8 देशात या चेंडूने क्रिकेट खेळले जाते. कूकाबुरा चेंडूचा वापर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, बांगलादेश, झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तानमध्ये केला जातो. तसेच, ड्यूक चेंडूने इंग्लंड, आयर्लंड आणि वेस्ट इंडिज देशात क्रिकेट खेळले जाते. एकटा भारत देश असा आहे, जो एसजी चेंडूचा वापर करतो.
कोणते चेंडू कोणत्या देशात वापरतात?
कूकाबुरा- ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, बांगलादेश, झिम्बाब्वे आणि पाकिस्तान
ड्यूक- इंग्लंड, आयर्लंड आणि वेस्ट इंडिज
एसजी- फक्त भारतात वापरला जातो
तिन्ही चेंडूंची खासियत काय?
1. ड्यूक चेंडू
इंग्लंडमध्ये बनणारा ड्यूक चेंडूची शिवण उंच असते. या चेंडूची शिलाई हाताने केली जाते. या चेंडूचा वेगवान गोलंदाजांना जास्त फायदा मिळतो. ड्यूक चेंडूची कठोरता 60 षटकांपर्यंत असते, तर 20-30 षटकांनंतर या चेंडूने गोलंदाजांना रिव्हर्स स्विंग करता येतो. रिव्हर्स स्विंग करण्याच्या बाबतीत कूकाबुरा आणि एसजी चेंडू वेगळे आहेत. दोन्ही चेंडूंनी 50 षटकांच्या आसपास रिव्हर्स स्विंग मिळतो.
2. एसजी चेंडू
एसजी चेंडूबाबत बोलायचं झालं, तर हा चेंडू भारतात बनतो. याची शिलाईही ड्यूक चेंडूप्रमाणेच हाताने केली जाते. या चेंडूची शिवणही उंच असते. या चेंडूने वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत फिरकीपटूंना जास्त मदत मिळते.
3. कूकाबुरा चेंडू
कूकाबुरा चेंडू ऑस्ट्रेलियामध्ये बनवला जातो. याची शिलाई मशीनने केली जाते. याची शिवण दाबलेली असते. सुरुवातीच्या 20 ते 30 षटकांपर्यंत चेंडू वेगवान गोलंदाजीसाठी चांगला असतो. यानंतर हा चेंडू फलंदाजांसाठी फायदेशीर ठरतो. शिवण दाबलेली असल्यामुळे हा चेंडू फिरकीपटूंसाठी इतर चेंडूंच्या तुलनेत कमी फायदेशीर असतो.
चेंडूंच्या वापराबाबत आयसीसीचे नियम काय?
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीनुसार, चेंडूच्या वापराबाबत खास असे नियम नाहीत. जिथे सामना किंवा मालिका असते, तो देश आपल्या हिशोबाने आणि आवडीनुसार चेंडूचा वापर करतो. कोणताही देश प्रत्येक मालिकेत वेगवेगळ्या चेंडूनेही खेळू शकतो. (cricket ball types in marathi dukes kookaburra and sg dukes ball use in wtc final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Love-Jihad Controversy: गुजरात संघाच्या खेळाडूचं इंस्टाग्राम हॅक? माफी मागितल्यानंतर केला नवीन खुलासा
ट्रॅफिकमध्ये अडकूनही धोनीने चाहत्याचा दिवस बनवला खास! व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘नशीबवान आहेस’