कोलंबो। काल निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेच्या शेवटच्या साखळी सामन्यात बांग्लादेशने शेवटच्या क्षणाला श्रीलंकेवर २ विकेट्सने मात केली. पण हा सामना रोमांचकारी निर्णयापेक्षा दोन संघातील खेळाडूंमध्ये झालेल्या बाचाबाचीमुळे जास्त गाजला.
तसेच सामना संपल्यानंतर बांगलादेश संघाच्या ड्रेससिंगरूमच्याही काचा फोडलेल्या दिसून आल्या आहेत. त्यामुळे आयसीसीचे सामना पंच ख्रिस ब्रॉड यांनी आर प्रेमदासा स्टेडियमच्या अधिकाऱ्यांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी मागितले आहेत. याबरोबरच बांगलादेश क्रिकेट बोर्डाने नुकसान भरपाई देण्याचीही तयारी दाखवली आहे.
या दोन संघांमध्ये शेवटच्या षटकातील एका चेंडूवर पंचांनी नो बॉल न देण्याच्या प्रकरणावरून वादाची ठिणगी पडली होती. यामुळे बांग्लादेश संघाने सामना संपल्यावर विजय साजरा करताना श्रीलंकेच्या खेळाडूंना काही हातवारे प्रकार करून डिवचण्याचाही प्रयत्न केला.
बांगलादेश संघाकडून झालेल्या गैरवर्तणूक प्रकरणी कर्णधार शाकिब अल हसन आणि नुरुल हसन यांच्या सामना वेतनातून २५% रक्कम दंड म्हणून कापण्यात आली.
नक्की काय झाले होते शेवटच्या षटकात:
बांग्लादेशला विजयासाठी शेवटच्या षटकात १२ धावांची गरज होती आणि त्यांच्या ७ विकेट्स आधीच पडल्या होत्या. यावेळी खेळपट्टीवर मेहमुद्दलाह आणि मुस्तफिझूर रहमान हे दोन फलंदाज होते. मुस्तफिझूर स्ट्रायकर एन्डला होता तर मेहमुद्दलाह नॉन स्ट्रायकर एन्डला होता.
श्रीलंकेकडून या षटकात इसुरु उडाणा गोलंदाजी करत होता. त्याने पहिले दोन्ही चेंडू शॉर्ट-पिचचे टाकले. पण तरीही दुसऱ्या चेंडूवर उंची असूनही पंचांनी नो बॉल दिला नाही असे मत मेहमुद्दलाहने पंचांकडे जाऊन व्यक्त केले. तसेच या चेंडूवर मेहमुद्दलाहला स्ट्राईक देण्याच्या नादात मुस्तफिझूर धावबाद झाला होता.
त्याचवेळी बांग्लादेशचा नुरुल हसन मैदानावर पाणी घेऊन आला आणि त्याने श्रीलंका कर्णधार थिसारा परेराशी शाब्दिक हुज्जत घातली. त्यामुळे बांग्लादेश कर्णधार शाकिबला आपल्या फलंदाजाला परत बोलवावे लागले.
यानंतर मेहमुद्दलाह आणि रुबेल हुसेनने श्रीलंकेने दिलेले १६० धावांचे आव्हान पार केले. शेवटच्या दोन चेंडूंत बांग्लादेशला ६ धावांची गरज असताना षटकाच्या पाचव्या चेंडूवर मेहमुद्दलाहने षटकार खेचत बांगलादेशचा विजय साकार केला.
या विजयामुळे बांग्लादेशने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. उद्या या मालिकेतील अंतिम सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात होणार आहे.