क्रीडाविश्वातील खेळांचा कुंभमेळा म्हणून ओळखली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धां नुकतीच जपानची राजधानी टोकियो येथे संपन्न झाली. जगभरातील सर्व महत्त्वपूर्ण खेळ ऑलिम्पिकमध्ये खेळले जात असताना क्रिकेट यापासून अलिप्त आहे. जगभरातील ७० हून अधिक देशात खेळले जाणारे क्रिकेट १९०० ऑलिम्पिकनंतर या सर्वात मोठ्या व्यासपीठावर कधीही खेळले गेले नाही. मात्र, ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) याबाबत पहिले सकारात्मक पाऊल टाकले आहे.
या ऑलिम्पिकमध्ये होणार क्रिकेटचा समावेश
जगभरातील सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या खेळांपैकी एक असलेले क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये खेळले जात नाही. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश असावा, अशी इच्छा चाहते अनेक वर्षापासून व्यक्त करत आहेत. याबाबत आता आयसीसीने पहिले सकारात्मक पाऊल टाकले आहे.
अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे २०२८ सालच्या ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. त्यामध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा यासाठी आयसीसी बोली लावणार आहे. याचाच एक भाग म्हणून आयसीसीने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष इयान व्हॉटमोर यांच्या अध्यक्षतेखाली आयसीसीच्या स्वतंत्र निर्देशक इंद्रा नुयी, झिम्बाब्वे क्रिकेटचे प्रमुख तवेंगवा मुकुहलानी, आयसीसी सहयोगी सदस्य निर्देशक महिंदा वल्लीपुरम व अमेरिका क्रिकेटचे प्रमुख पराग मराठे हे सदस्य असलेली एक समिती स्थापन केली आहे. हे सर्वजण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडे क्रिकेटचा समावेश करण्याबाबत पाठपुरावा करतील.
सलग दोन ऑलिम्पिकमध्ये खेळले जाऊ शकते क्रिकेट
अमेरिकेमध्ये क्रिकेटचा वाढता प्रसार पाहता लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्याबरोबरच २०३२ ऑलिम्पिक ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे होणार असल्याने या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश खात्रीशीर मानला जात असून, असे झाल्यास १९०० पॅरिस ऑलिम्पिकनंतर प्रथमच ऑलम्पिकमध्ये क्रिकेट खेळले जाईल. त्यावेळी केवळ इंग्लंड व फ्रान्स यांच्या दरम्यान क्रिकेटचा सामना खेळला गेला होता. २०२२ बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
तर ठरलं! ‘या’ क्लबसाठी मेस्सी दाखवणार आपला जलवा, लवकरच होणार अधिकृत घोषणा
लॉर्ड्सवरील ‘अशा’ आकडेवारीने वाढवलीय भारतीय संघाची चिंता