जवळपास महिनाभरापासून चर्चेत असलेला अर्जेंटिनाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी हा आता बार्सिलोना सोडून दुसऱ्या क्लबसाठी खेळण्याचे निश्चित झाले आहे. आर्थिक मुद्द्यावरून स्पेनमधील बार्सिलोना फुटबॉल क्लबला रामराम केलेला मेस्सी आता फ्रान्समधील पॅरिस सेंट जर्मन (पीएसजी) या संघासाठी खेळताना दिसेल. याबाबतची अधिकृत घोषणा संघाकडून लवकरच करण्यात येईल. तो इंग्लंडमधील मँचेस्टर सिटी क्लबसाठी खेळणार असल्याच्या बातम्यांना यामुळे पूर्णविराम मिळाला आहे.
मागील महिन्यात संपला बार्सिलोना सोबतचा करार
मागील तब्बल २२ वर्षापासून स्पेनमधील प्रसिद्ध बार्सिलोना फुटबॉल क्लबचा सदस्य असलेल्या मेस्सीचा करार जुलै महिन्यात संपुष्टात आला होता. त्यानंतरही, बार्सिलोना क्लबने मेस्सी आपल्याकडेच राहावा यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, ला लीगा या स्पर्धेच्या नियमानुसार मेस्सीची करार रक्कम अगदीच कमी करता येत नसल्याने त्याला क्लब सोडावा लागला. त्यामुळे बार्सिलोना व मेस्सी यांचे २२ वर्षांचे नाते संपुष्टात आले. ३४ वर्षीय मेस्सीने बार्सिलोनासाठी ५२० सामने खेळताना ४७४ गोल केले आहेत.
असा असेल नवा करार
मेस्सीने पीएसजी या फ्रान्समधील फुटबॉल क्लबसाठी खेळण्याचे निश्चित केल्याचे वृत्त आले आहे. पुढील काही तासात याबाबतची अधिकृत घोषणा होऊ शकते. नव्या करारानुसार मेस्सीला ३५ मिलीयन युरो दरवर्षी मिळतील. हा करार दोन वर्षाचा असेल. तसेच, मेस्सीची इच्छा असल्यास आणखी एक वर्ष त्याला पीएसजीसाठी खेळता येईल.
फ्रान्ससमधील प्रमुख फुटबॉल लीग असलेल्या लीग १ या स्पर्धेमध्ये पीएसजी क्लब सहभागी होत असतो. संघाने तब्बल नऊ वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. सध्या या संघामध्ये ब्राझीलचा स्ट्रायकर नेमार, अर्जेंटिनाचा एंजेल डी मारिया, स्पेनचा सर्जिओ रॅमोस, फ्रान्सचा किलीयन म्बापे व मागील महिन्यातच इटलीली युरो कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडलेला गोलरक्षक जियानलुची डोनारोमा हे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय फुटबॉलर आहेत. मेस्सीचा समावेश झाल्याने पीएसजी जगातील सर्वात मजबूत व्यवसायिक फुटबॉल क्लब बनल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
लॉर्ड्सवरील ‘अशा’ आकडेवारीने वाढवलीय भारतीय संघाची चिंता
तीन वर्षांपूर्वी भारतासाठी जिंकला वर्ल्डकप, आता पोटापाण्यासाठी करावी लागतेय मजुरी
विराट कोहलीच्या लाडक्या लेकीचे लंडनमध्ये झाले खास स्वागत, पाहा फोटो