मंगळवार, ३ जुलैला भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर ८ गड्यांनी विजय मिळवला.
भारतीय संघाने या विजयासह आपल्या महत्वपूर्ण इंग्लंड दौऱ्याची विजयी सुरवात केली.
भारतीय कर्णधार विराट कोहलीने टॉस जिकंत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या ५ षटकांत इंग्लंडचे सालामीवीर जेसन रॉय आणि जॉस बटलर यांनी धावफलकावर ५० धावा लावत जोरदार सुरवात केली होती.
मात्र त्यानंतर वेगवान गोलंदाज उमेश यादवने भारतीय संघाला ५ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जेसन रॉयला बाद करत पहिले यश मिळवून दिले.
तर भारताचा युवा चायनामेन गोलंदाज कुलदीप यादवने इंग्लंडच्या फलंदाजीचे २४ धावांमध्ये ५ बळी घेत अक्षरशा कंबरडे मोडले.
सलामीवीर जॉस बटलर ६९, जेसन रॉय ३० आणि तळातील फलंदाज डेव्हीड विली २९ वगळता इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही.
गेल्या एक वर्षापासून मर्यादित षटकांच्या सामन्यात जगभरातील सर्वच फलंदाजांची डोकेदुखी ठरलेल्या कुलदीप यादवने आपली जादू कायम राखत इंग्लंडची फलंदाजी उध्वस्त केली.
इंग्लंड संघाने २० षटकात आठ गड्यांच्या मोबदल्यात १५९ धावा करत भारताला १६० आव्हान दिले.
इंग्लंडच्या १६० धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या भारतीय संघाची सुरवात खराब झाली. इंग्लंडच्या डेव्हीड विलीने सलामीवीर शिखर धवनला पहिल्याच षटकात ४ धावांवर बाद करत भारतीय संघाला पहिला धक्का दिला.
त्यानंतर फलंदाजीस आलेल्या केएल राहुलने आपला आयपीएलचा फॉर्म कायम राखत धडाकेबाज शतक करून भारतीय संघाचा विजय निश्चित केला.
केएल राहुलने ५४ चेंडूत १० चौकार आणि ५ षटकारांच्या साहय्याने १०१ धावांची वादळी खेळी केली.
तर सलामीवीर रोहित शर्माने ३० चेंडूत ३२ धावांची संयमी खेळी करत भारतीय संघाच्या विजयात हातभार लावला. तसेच कर्णधार कोहलीने यामध्ये नाबाद २० धावांचे योगदान दिले.
भारतीय संघाने हे आव्हान १८.२ षटकात दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
महत्त्वाच्या बातम्या-
-आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये आज झाली विश्वविक्रमी भागिदारी
-सौरव गांगुलीपाठोपाठ आता गंभीरही करणार या क्रिकेट बोर्डात बाॅसगिरी!