न्यूझीलंड क्रिकेटला मार्टिन क्रो, स्टीफन फ्लेमिंग, नथन अॅस्टल, ख्रिस क्रेन्स, ब्रँडन मॅक्युलम, टॉम लेथम यासारख्या एकापेक्षा एक स्फोटक फलंदाजाची परंपरा लाभली आहे. या संघाला इतरही काही गुणवत्तापूर्ण खेळाडू लाभले. मात्र, चुकीच्या मार्गाला लागल्याने त्यांची कारकीर्द संपली. त्यापैकी एक म्हणजे उजव्या हाताने फलंदाजी करणारा लू व्हिन्सेंट.
वडील पत्रकार; मुलगा क्रिकेटपटू
लू व्हिन्सेंट यांचा जन्म न्यूझीलंडमधल्या वार्कवर्थमध्ये झाला. त्याचे वडील माइक व्हिन्सेंट हे प्रसिद्ध क्रीडा पत्रकार होते. त्यांच्यामुळेच लू व्हिन्सेंटला क्रिकेटची आवड निर्माण झाली. व्हिन्सेंट जेव्हा पंधरा वर्षाचा होता तेव्हा त्याच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर तो एडिलेड येथे आला. तेथे त्याला क्रिकेटमध्ये संधी मिळत नसल्यामुळे 18 वर्षांचा झाल्यानंतर त्याने पुन्हा न्यूझीलंडला जाण्याचा निर्णय घेतला. नशिबाने त्याला न्यूझीलंडच्या 19 वर्षाखालील विश्वचषकाच्या संघात स्थान मिळाले.
काऊंटी क्रिकेटमध्येही दमदार प्रदर्शन
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शनानंतर २००१ साली न्यूझीलंड क्रिकेटमध्ये संघात त्याला स्थान मिळाले आणि नशिबाचा दरवाजा उघडला. पहिल्याच सामन्यात त्याने स्फोटक खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर त्याने लँकेशायर सक्सेस नॉर्थैम्पटनशर, वूस्टरशर या संघाकडून काउंटी क्रिकेट देखील खेळला.
मॅचफिक्सिंगचे ग्रहण
2008 साली लू व्हिन्सेंटच्या कारकीर्दीला मॅचफिक्सिंगचे ग्रहण लागले. काउंटी क्रिकेट आणि त्याचबरोबर इंडियन क्रिकेट लीगमध्ये त्याने मॅच फिक्सिंग केल्याची कबुली दिली. इंग्लंडमध्ये त्याच्यावर काऊंटी क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली. तो पुन्हा इंग्लंडहून न्यूझीलंडला आला. मॅच फिक्सिंगमुळे एक चांगला क्रिकेटपटू न्यूझीलंडला कायमस्वरूपी गमवावा लागला. तो आता कोणत्याही प्रकारचा क्रिकेट खेळून पैसे कमी शकत नाही. याबरोबरच तो कोचिंग करणे आणि स्टेडियममध्ये येण्यावरही त्याच्या बॅन लावण्यात आला आहे.
न्यूझीलंड हेराल्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या तो एका बिल्डिंग कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करत आहे. एकेकाळी लाखो रुपये कमवणारा हा क्रिकेटपटू आज कंगाल झाला असून कामगार म्हणून काम करत आहे.
शतक ठोकून गाजवले पदार्पण
लू व्हिन्सेंट हा खूपच आक्रमक फलंदाज होता. आपल्या पदार्पणाच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पर्थ या जगातील सर्वात वेगवान खेळपट्टीवर शतकी खेळी करत पदार्पण गाजवले. या सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. पुढे त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या एका सामन्यात 172 धावांची तुफानी खेळी केली. ज्यातील 118 धावा केवळ चौकार आणि षटकारातून आल्या होत्या. लू व्हिन्सेंटने न्यूझीलंड क्रिकेटकडून 23 कसोटी, 9 टी ट्वेन्टी आणि 102 एकदिवसीय सामने खेळले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर सहा शतकांची नोंद आहे.
लू व्हिन्सेंटप्रमाणेच न्यूझीलंडच्या काही खेळाडूंवरही आले वाईट दिवस-
ख्रिस क्रेन्स या माजी अष्टपैलू खेळाडूवरही अशीच वेळ आली होती. तो बस धुण्याचे काम करत होता. बलाढय़ संघाविरुद्ध भन्नाट गोलंदाजी करत आपल्या संघाला एकहाती सामने मिळवून देणारे एविन चॅटफील्ड संघर्ष करताना दिसून येत आहेत. 70 वर्षीय चॅटफील्ड रस्त्यांवरती बसून चिप्स विकत आहेत.