भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आज निवृत्तीची घोषणा केली. धोनीचे सध्याच्या भारतीय संघातील युवा खेळाडूंबरोबर नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. अनेकदा तो युवा खेळाडूंना सल्ले देतानाही दिसला आहे.
असाच धोनीबरोबरच एक खास किस्सा गौरव कपूर होस्ट करत असलेल्या ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन’ या चॅट शोमध्ये भारताचा युवा फिरकीपटू युजवेंद्र चहलने एकदा शेअर केला होता. या चॅट शोमध्ये चहलने त्याच्या आतंरराष्ट्रीय पदार्पणाविषयीची आणि धोनीबद्दलची एक आठवण सांगितली.
चहलने 11 जून 2016 ला झिम्बाब्वे विरुद्ध हरारेमध्ये वनडे सामन्यातून आतंरराष्ट्रीय पदार्पण केले होते. 2016 च्या भारताने केलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी चहलची संघात निवड झाली होती.
ही निवड झाल्याचे कळल्यानंतरच्या भावनांविषयी सांगताना चहल म्हणाला, “माझ्यासाठी तेव्हाचा आयपीएलचा मोसम चांगला गेला होता. मला माहित नव्हते की भारतीय संघाची घोषणा होणार आहे. जेव्हा बीसीसीआयच्या वेबसाईटवर खेळाडूंची नावे जाहीर झाली. त्यावेळी मी जवळ जवळ अर्धा तास ती नावे बघत होतो.”
“माझे नाव बघुन मी खूप रडलो. ज्या दिवशी मी जर्सी घातली त्याचे वर्णन शब्दात करू शकत नाही. ”
पुढे पदार्पणाविषयी त्याने सांगितले, “मला वनडे कॅप एमएस धोनीकडून मिळाली. तो दिग्गज आहे आणि मी पहिल्यांदाच त्याला भेटत होतो. मला त्याच्यासमोर बोलताही येत नव्हते.”
“जेव्हा झिम्बाब्वेमध्ये पहिल्यांदा मी त्याला भेटलो तेव्हा मी त्याला माही सर असे म्हटलो होतो.काहीवेळानंतर त्याने मला बोलावले आणि सांगितले की ‘माही, धोनी, महेंद्रसिंग धोनी किंवा भाई… असे काहीही म्हण पण सर म्हणू नको’.”
पदार्पणानंतर चहलने चांगली प्रगती केली. त्याच्या या प्रवासात गोलंदाजी करताना अनेकदा यष्टीमागून त्याला धोनीकडून चांगले सल्लेही मिळाले आहेत.