भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (१७ जुलै) लिड्स येथिल हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर होणार आहे.
भारताचा कुलदीप यादव टी-२० मालिकेत आणि या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरला आहे.
या पार्श्वभूमीवर तिसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने, इंग्लंड संघाकडे कुलदीप यादवला रोखण्यासाठी योजना अाखल्या आहेत असे म्हणाला.
“कुलदीप गेल्या दोन सामन्यात त्याच्या पहिल्या काही षटकांमध्ये सातत्याने बळी मिळवत आहे. त्यामुळे त्याची उर्वरीत सामन्यात गोलंदाजी चांगली होत आहे. कुलदीपला आम्ही या सामन्यान बळी न देता, त्याचा फिरकी मारा निष्प्रभ ठरवणार आहोत.” पत्रकार परिषदेत बोलताना मार्क वुड म्हणाला.
“कुलदीप यादवने दुसऱ्या सामन्यात ३ बळी जरी मिळवले असले तरी आमचे फलंदाज त्याच्या विरुद्ध धावा करण्यात यशस्वी ठरले आहेत. ही आमच्यासाठी कुलदीप विरुद्ध खेळताना जमेची बाजू आहे.” असे मार्क वुडने सांगितले.
कुलदीप यादवने पहिल्या सामन्यात २५ धावात ६ तर, दुसऱ्या सामन्यात ६८ धावात ३ बळी मिळवले होते.
टी-२० मालिकेतील दोन सामन्यात ५ बळी मिळवले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-वनडे मालिका विजयासाठी भारत आणि इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या निर्णायक सामन्याविषयी सर्वकाही…
-दमदार शतकासह अॅलिस्टर कुकचा भारताला इशारा