पाकिस्तान क्रिकेट हे एक अजब रसायन आहे. गुणवत्ता आणि कौशल्याच्या बाबतीत कुठेही कमी नाहीत ते. परंतु राजकारण आणि भ्रष्टाचार यांनी त्यांचं अपरिमित नुकसान केलं. या भरीस देशात असलेला आतंकवाद त्यांना हानिकारक ठरला.
२००९ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकन संघावर गोळीबार झाला. या भेकड हल्ल्यात सहा क्रिकेटपटू जखमी झाले. सहा पाकिस्तानी पोलीस अधिकारी आणि दोन पाकिस्तानी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. जखमींच्या यादीत अजून एक नाव होते, ते म्हणजे पाकिस्तानमधील क्रिकेट. २०११ विश्वचषकाचे यजमानपद त्यांच्याकडून हिरावून घेण्यात आले. पुढे प्रत्येक संघाने पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यास नकार दिला.
खुद्द PCL दुबईमध्ये खेळवण्यात येते. २०१५ मध्ये झिम्बाब्वे दौरा आणि २०१७ मध्ये PCL अंतिम सामना हेच काय गेल्या ८ वर्षात पाकिस्तानात खेळले गेले. २०१७मध्ये ICCने पाकिस्तानातील क्रिकेटला अनूकूलता दाखवली. अँडी फ्लॉवरला संघ निवडण्याची जबाबदारी दिली गेली व ३ T२० सामने खेळायची परवानगी दिली.
१२ सप्टेंबर पासून हे सामने लाहोरमध्ये सुरु होतील. डू-प्लेसीसच्या कर्णधारपदाखाली इम्रान ताहीर, पॉल कॉलिंगवूड, मोर्ने मॉर्केल, जॉर्ज बेली, तामीम इक्बाल, डेविड मिलर इत्यादी प्रभूती या ऐतिहासिक सामन्यात खेळतील .
मात्र अशाप्रकारे तयार झालेला हा पहिला जागतिक संघ नाही. क्रिकेटमध्ये या आधी सुद्धा असे संघ खेळले आहेत. त्यांचा घेतलेला हा धावता आढावा.
१९७०मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर यायचा होता. मात्र त्यांची एक अडचण होती. इंग्लंडने आपल्या संघात बेसिल डि’ओलिव्हिएरा या गोरा नसलेल्या खेळाडूचा समावेश केला होता. हा खेळाडू मूळ दक्षिण आफ्रिकेचा. पण तेथील वर्णद्वेषाला कंटाळून तो इंग्लंडमध्ये खेळायला आला. दक्षिण आफ्रिकेच्या सत्ताधारी लोकांना नेमकं हेच खटकलं. त्यांनी दौरा करायला नकार दिला. याच बरोबर दक्षिण आफ्रिकेवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बहिष्कार घातला गेला. पुन्हा खेळायला १९९२ साल उजाडावं लागलं. त्याकाळी आजसारखं प्रचंड क्रिकेट नव्हतं. दक्षिण आफ्रिकेचा दौरा एवढंच क्रिकेट इंग्लंडकडे त्या सत्रात होतं.
यावर उपाय म्हणून विविध देशातील खेळाडूंना एकत्र करून एक संघ बनवण्यात आला. सर गारफिल्ड सोबर्स यांच्या नेतृत्वाखाली क्लाइव्ह लॉईड, लान्स गिब्स, रोहन कन्हाय, फारुख इंजिनिअर, इंतिखाब आलम, बॅरी रिचर्ड्स, ग्रॅहम पोलॉक असे दादा खेळाडू एका संघात आले. इंग्लंडचा संघ देखील पूर्ण ताकदीनिशी खेळला. मालिका अर्थात उत्कंठावर्धक झाली.
५ कसोटी सामने असलेल्या या मालिकेत शेष देशांचा संघ ४-१ असा विजयी ठरला. गॅरी सोबर्स, रोहन कन्हाय, बॉयकॉट, एडी बार्लो अशांच्या शतकाने चाहत्यांना खुश केले. जॉन स्नो, पीटर लिव्हर, एडी बार्लो, इंतिखाब आलम यांनी गोलंदाजीत चमक दाखवत खोऱ्याने बळी मिळवले. थोडक्यात चांगल्या दर्जाचे क्रिकेट बघायला मिळाले. या सामन्यांना कसोटीचा दर्जा देण्यात आला होता पण कालांतराने तो काढून टाकला गेला.
१९७१ – शेष संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा
दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंडप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा दौरा सुद्धा फिस्कटला. तेव्हा पुन्हा शेष संघाने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. यावेळी अजून काही खेळाडू त्यात जोडले गेले. त्यात सुनील गावस्कर, बिशन सिंग बेदी, झहीर अब्बास हे खेळाडू होते. ऑस्ट्रेलियात इयान चॅपेल, ग्रेग चॅपेल आणि रिची बेनॉ यांनी जबरदस्त झुंज दिली. ऑस्ट्रेलिया ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-२ अशी पराभूत झाली. एक दिवसीय मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली. शेष संघ बरेच सामने ऑस्ट्रेलियन राज्यांविरूद्ध सुद्धा खेळला. या दौऱ्यावर ते एकूण १६ सामने खेळले.
२००४ – त्सुनामी रिलीफ सामना
२००४ला आलेल्या त्सुनामीमध्ये श्रीलंकेचं जबरदस्त नुकसान झाले. तेव्हा मदतीसाठी ICCने हात पुढे सरसावला. आशिया विरुद्ध इतर असा सामना ठरवण्यात आला. या मालिकेत मेलबर्न येथे एकच ५०-षटकांचा सामना खेळवला गेला. शेष संघात ५ ऑस्ट्रेलियन, ३ न्यूझीलंड तर ३ वेस्ट इंडिज आणि १ इंग्लिश खेळाडू होता. आशिया संघात ६ भारतीय, ४ श्रीलंकन, २ पाकिस्तानी आणि १ बांगलादेशी खेळाडूचा भरणा होता.
शेष संघाने पहिली फलंदाजी करत ३४४ धावा चोपले. कर्णधार रिकी पॉन्टिंग याचे शतक, लाराच्या ५२ धावा आणि केर्न्स याची फटकेबाजी यांनी शेष संघाला एका मजबूत स्थितीत आणले. आशियाई संघ पाठलाग करताना कोलमडला. सेहवाग-जयसूर्या यांनी एक चांगली सुरुवात करून दिली. परंतु इतके मोठ्या लक्ष्याचा दबाव त्यांच्यावर पडला. ११२ धावांनी ते पराभूत झाले, व्हेटोरीने ३ बळी मिळवले.
२००५- ICC सुपर सिरीज
२००५चा ऑस्ट्रेलियन संघ हा अश्वमेधाचा घोडा होता. त्याला रोखणं हे कोणत्याच संघाला जमत नव्हत. ICCने यासाठी एक खास संघ बनवायचं ठरवलं.
अरविंदा डिसिल्वा, क्लाइव्ह लॉईड, सुनील गावस्कर अशा निवड समितीने एक परिपूर्ण आणि बलवान शेष संघ निवडला. सर्व देशांचे सामान प्रतिनिधित्व होते यामध्ये.
ऑस्ट्रेलियात ३ एक दिवसीय सामने आणि एक कसोटी सामना असा कार्यक्रम होता. मात्र पहिल्या एकदिवसीय सामन्यापासूनच भविष्य साफ दिसायला लागलं. तिन्ही एकदिवसीय सामने आणि कसोटी सामना या सर्वात ऑस्ट्रेलियाने शेष संघाचा दारुण पराभव केला. कदाचित जिंकण्यापेक्षा, हे सर्व सामने अनुभवणे शेष संघाला महत्वाचे वाटले. खेळांना जास्त किंमत न देणं त्यांना भोवलं.
त्यानंतर पुन्हा असा प्रयत्न झाला नाही. पाकिस्तान दौऱ्याच्या निमित्ताने ICCने पुन्हा एक जागतिक संघ बनवला आहे. विविध देशातील खेळाडू एकत्र येऊन कसे खेळतील हे पाहणे नक्कीच उत्कंठावर्धक ठरेल.
-ओंकार मानकामे