श्रीलंका संघावर पाकिस्तानमध्ये जेव्हा हल्ला झाला तेव्हा श्रीलंका संघाच्या बसचे सारथ्य करत असलेल्या ड्राइवरला धोनीने शूर असे म्हटले होते.
२००९ साली श्रीलंका संघाला गडाफी स्टेडियम, लाहोर येथे घेऊन जात असलेल्या बसवर तब्बल १२ अतिरेक्यांनी हल्ला केला. हे खेळाडू दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ खेळण्यासाठी मैदानाकडे जात असताना हा हल्ला झाला होता.
यात संघातील ६ खेळाडू जखमी झाले होते तर २ नागरिक आणि ६ पोलीस यात मृत्युमुखी पडले होते.
यावेळी मेहेर मोहम्मद खलील हा श्रीलंका संघाच्या बसचा ड्राइवर अनेक अर्थांनी हिरो ठरला होता. यावेळी जेव्हा बसवर अतिरेक्यांनी हल्ला केला तेव्हा प्रसंगावधान राखून चतुराईने त्याने खेळाडूनं वाचवले. त्यामुळे पाकिस्तान आणि श्रीलंका देशात हा ड्राइवर तेव्हा हिरो ठरला होता.
आपल्या उद्योगधंद्यानिमित्त तो जेव्हा मोरोक्को आणि दक्षिण आफ्रिकेला गेला होता तेव्हा तो कॅप्टन कूल एमएस धोनी आणि सुरेश रैना यांना भेटला होता.
“मी जेव्हा धोनी आणि रैना यांना दक्षिण आफ्रिकेत भेटलो होतो तेव्हा रैना माझ्याशी खूप चांगला बोलला तर धोनी म्हणाला, ‘तू खूप शूर आहेस, तू त्यांना वाचवलंस. यावरमी धोनीला म्हणालो, ‘श्रीलंकन खेळाडू मला भावासारखे आहेत. एक भाऊ दुसऱ्यासाठी जीव पण देऊ शकतो. ” असे मेहेर मोहम्मद खलील इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते.
त्याच्या या कृत्यामुळे जेव्हा २०१५ साली झिम्बाब्वे संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला होता तेव्हा या बसचे सारथ्य देखील मेहेर मोहम्मद खलीलकडे देण्यात आले होते. २००९ हल्ल्यानंतर पाकिस्तान दौऱ्यावर आलेला झिम्बाब्वे पहिला संघ होता.