ऑस्ट्रेलियाचा संघ या मालिकेत २-० ने मागे आहे. जर भारताने इंदोरमधील वनडे सामना जिंकला तर भारत ही मालिका खिशात घालेल. ऑस्ट्रेलियाला जर या मालिकेत आव्हान राखायचे असेल तर तिसरा वनडे सामना त्यांच्यासाठी ‘करो या मरो’ असा असेल. मागील दोन्ही वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजांना बांधून ठेवले आहे पण त्यांच्या फलंदाजांनाही चांगली कामगिरी करता आलेली नाही.
ऑस्ट्रेलियाला जर या मालिकेत पुनरागमन करायचे असेल तर त्यांना हे बदल करणे अनिवार्य आहे :
१. वॉर्नरचा सलामीचा साथीदार म्हणून ट्रॅव्हिस हेडला संधी देणे.
हिल्टन कार्टराईट या युवा फलंदाजाला सलामीला पाठवण्याचा प्रयोग पूर्णपणे अपयशी ठरला आहे. त्याने पहिल्या दोन्ही सामन्यात सुमार कामगिरी केली आहे. सध्याची भारतीय गोलंदाजी ही जगातील सर्वात चांगल्या गोलंदाजीपैकी एक मानली जाते. त्यामुळे जर भारताच्या गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाला चांगली कामगिरी करायची असेल तर त्यांना सलामीवीराची जोडी बदलणे गरजेचे आहे.
ट्रॅव्हिस हेड या डावखुऱ्या फलंदाजाने पहिल्या दोनही सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला जर फलंदाजीच्या क्रमात वर संधी मिळाली तर तो आणखी उत्तम कामगिरी करेल. त्याला आयपीएलमध्ये खेळण्याचाही अनुभव असल्यामुळे त्याला भारतीय गोलंदाजांना खेळण्याचा अनुभव आहे.
२. हिल्टन कार्टराईटच्या ऐवजी पीटर हँडकॉम्बला संधी देणे.
पहिल्या दोन्ही सामन्यात सुमार कामगिरी करणाऱ्या हिल्टन कार्टराईटच्या ऐवजी पीटर हँडकॉम्बला संधी द्यायला काहीच हरकत नाही. पीटर हँडकॉम्बला भारतात खेळण्याचा अनुभव आहे आणि त्याने याच वर्षी ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध एक कसोटी सामना हरण्यापासून वाचवले होते.
त्याच बरोबर चायनामॅन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव हा डावखुऱ्या गोलंदाजांवर पूर्णपणे भारी ठरला आहे. त्यामुळे पीटर हँडकॉम्बसारख्या अनुभवी फलंदाजाला संधी देऊन ऑस्ट्रेलिया संघात आजून स्थिरता आणण्याचा प्रयत्न करेल.
३. ऍडम झाम्पाला संधी देणे.
पहिल्या वनडे सामन्यात झाम्पाने जर हार्दिक पांड्याची विकेट घेतली नसतीस तर भारताचा स्कोर सहज ३०० पार गेला असता. जरी पंड्याने झाम्पाविरुद्ध एका षटकात २४ धावा काढल्या असल्या तरी पांड्याची विकेट घेणे गरजेचे होते. एगारपेक्षा झाम्पा हा विकेट घेण्यास जास्त सक्षम आहे. भारताचे दोन्ही रिस्ट स्पिनर्स कुलदीप आणि चहल यांनी चांगली कामगिरी केली आहे.
त्याचबरोबर इंदोरची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजाना पूरक असणार आहे. त्यामुळे एगारच्या जागी झाम्पाला खेळवणे एक चांगला पर्याय आसू शकतो.
४. जेम्स फाल्कनरच्या ऐवजी ग्लेन मॅक्सवेलला संधी देणे.
मागील काही सामन्यात जेम्स फाल्कनरने अत्यंत सुमार गोलंदाजी केली आहे, त्याचबरोबर त्याच्या गोलंदाजीमध्ये ही आधी सारखी धार दिसलेली नाही. त्याचा कमी वेगाचा चेंडू ही सर्वांच्या लक्षात आलेला आहे. त्यामुळे त्याला भारतीय फलंदाजांच्या विरुद्धच्या गोलंदाजी करणे अवघड जात आहे.
दुसऱ्या बाजूला मॅक्सवेलने कुलदीप यादव विरुद्ध चांगली फलंदाजी केली आहे. मागील सामन्यात तो लवकर बाद झाला पण ज्याप्रकारे त्याने कुलदीपचा सामना केला असे दिसून येते की पुढील सामन्यात तो चांगली कामगिरी करून दाखवेल. त्याच बरोबर मॅक्सवेल गोलंदाजीमध्ये ही हातभार लावू शकतो.
५. मॅथ्यू वेडला पर्याय शोधणे.
मॅथ्यू वेडने पहिल्या दोन्ही सामन्यात चांगली कामगिरी केली नाही. पहिल्या सामन्यात त्याने ९ धावा केल्या तर दुसऱ्या सामन्यात ०. यष्टीरक्षक म्हणून मॅथ्यू वेडने चांगली कामगिरी केली आहे पण एक फलंदाज म्हणून त्याने संघाला निराश केले आहे.
जर मॅथ्यू वेडला बसवले तर पीटर हँडकॉम्बला यष्टिरक्षकाची जबाबदारी घ्यावी लागले आणि मग कर्णधार संघात आणखीन एक फलंदाज घेऊ शकतो.